सामाजिक क्षेत्रातील नवनिर्माण गौरव पुरस्कार जलयोद्धा अनिकेत लोहिया, तर वैज्ञानिक क्षेत्रातील पुरस्कार शिवाजी माने यांना जाहीर
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त २५ आणि २६ ऑक्टोबरला भरगच्च कार्यक्रम

रत्नागिरी : कोकणातील अखेरच्या घटकातील उपेक्षित विद्यार्थ्याला उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी “शिक्षणाच्या हक्कासाठी” हे ब्रीद घेऊन वाटचाल करणार्या नवनिर्माण शिक्षण संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष. या निमित्ताने संस्थेने येत्या २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रत्नागिरी येथे फिजीओथेरपी महाविद्यालय उद्घाटन, कै. मोहन खातू क्रीडा संकुल अनावरण तसेच राज्यपातळीवर विज्ञान, सामाजिक, शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणार्या मान्यवरांना यावर्षीपासून नवनिर्माण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. दुष्काळी भागात जलसंवर्धनाचे भरीव कार्य करणारे आणि एक प्रयोगशील व्यक्तिमत्व असलेले अनिकेत लोहिया व वैज्ञानिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे युवा कार्यकर्ते शिवाजी माने हे पहिल्या वहिल्या नवनिर्माण पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. २६ ऑक्टोबर रोजी पद्मश्री डॉ. झहीर काझी, माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे आणि प्रा. सुकुमार शिंदे उपस्थित होते. या संदर्भात बोलताना ते हेगशेट्ये म्हणाले की, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून या प्रवासाचे अनेक साक्षीदार आहेत. वंचित बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांना, युवकांसाठी प्रेरणादायी आणि प्रज्वलीत करणारे अंकुर मनात जागवू शकतील अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना संस्थेच्या माध्यमातून सन्मानित करत, त्यांचे आदर्श, धडपड, कोकणच्या नवनिर्माणच्या विद्यार्थी, पालक, युवक आणि तमाम रत्नागिरीकरांसाठी एक प्रेरणास्त्रोत, मानदंड असावा अशी प्रचंड इच्छा गेल्या दशकाची होती. आज २५ वर्षांच्यानिमित्ताने (रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त) हा संकल्प नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुढील दीर्घ काळासाठी सुरु करत आहोत.
महाराष्ट्रात विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणार्या मान्यवरांचा संस्थेतर्फे सत्कार करावा. त्यांना सन्मानित करावे, संस्थेत बोलवावे, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याची ओळख नवनिर्माण परिवार आणि रत्नागिरीकरांना व्हावी, या उद्देशाने संस्थेने चार क्षेत्रांची निवड केली आहे. यातील विज्ञान, शिक्षण, सामाजिक, साहित्य या चार क्षेत्रांपैकी दरवर्षी दोन क्षेत्रांतील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना नवनिर्माण गौरव पुरस्काराने रत्नागिरी येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात येईल. २५ हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असेल. यंदाचा नवनिर्माण गौरव पुरस्कार’ सामाजिक क्षेत्रात विशेष, अतुलनीय काम करणार्या ‘मानवलोक’ संस्थेचे अनिकेत लोहिया (आंबेजोगाई) यांना आणि विज्ञान क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या शिवाजी माने (जढाळा, लातूर) यांना जाहीर करण्यात आला आहे. २६ ऑक्टोबरला सायंकाळी ४.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा नवनिर्माण शिक्षण संस्था, एस.एम जोशी विद्यानिकेतन, रत्नागिरी येथे पद्मश्री डॅा. गणेश देवी, माजी खासदार, डॉ. भालचंद्र मुणगेकर, पद्मश्री डॉ. झहीर काझी, श्री. नितीन वैद्य, प्रा. डॉ. प्रदीप ढवळ या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
यावर्षी सामाजिक व वैज्ञानिक क्षेत्रातील दिग्गजांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर पुढील दोन वर्षांनी शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे अभिजीत हेगशेट्ये यांनी सांगितले.
तत्पूर्वी २५ ऑक्टोबर रोजी नवनिर्माण शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सवी सोहळा एस. एम. जोशी विद्यानिकेतन येथे होणार आहे. सकाळी ९ वाजता एमकेसीएलचे संचालक डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्द्घाटन होईल. त्यानंतर १० ते १ यावेळेत ‘बदलते जग, बदलते शिक्षण’ याविषयावर शिक्षण परिषद होईल. दुपारी २ ते ४ यावेळेत दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) आणि संगमेश्वर येथील विद्यार्थ्यांचा ‘कलाविष्कार तरुणाईचा’ हा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४ ते ६ यावेळेत ‘नवनिर्माण फेस्ट’ हा कर्मचारी स्नेहमेळावा होईल. सायंकाळी ६ ते रात्री ८ यावेळेत कवी अशोक बागवे, संगीतकार कौशल इनामदार आणि सहकारी यांचा काव्य मैफीलीचा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमांचा आस्वाद रत्नागिरीकरांनीही घ्यावा, असे आवाहन श्री. हेगशेट्ये यांनी केले आहे.



