धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध

रत्नागिरी : सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २५ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी लागू केले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याने तसेच सर्व संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी श्री. सिंह यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय/संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत २५ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध घातल्याचा आदेश दिला.



