रत्नागिरीत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक
उमेदवारी निष्ठावंताला की अन्य पक्षातून आयात करणाऱ्यांना? यावर होणार सविस्तर चर्चा

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेतून निष्ठावंतांला की अन्य पक्षातून आयात करणा-यांना उमेदवारी संधी दिली जावी, यावर ठाकरे गटाची आज (५ ऑक्टोबर) रत्नागिरीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक पदाधिकारी निष्ठावंतांना संधी देण्यावर ठाम भूमिकेत राहिले आहेत.
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून ते उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेणार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सलग ४ टर्म निवडून येणारे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्यासाठी ठाकरे शिवसेनेत चाचपणी सुरू आहे. त्यासाठी सहसंप्रक प्रमुख राजेंद्र महाडीक आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने या दोन मातब्बरांची नावे आघाडीवर आहेत.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा करत असताना शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुती असल्यामुळे ही जागा शिवसेनेच्याच पदरात पडणार आहे; परंतु गेली दोन ते तीन वर्षे भाजपकडून इथे आपल्याला उमेदवारी मिळेल ही अपेक्षा धरून काम करणारे भाजपचे माजी आमदार बाळ माने उमेदवारीसाठी उबाठात जाण्याची जोरदार चर्चा सुरू होती. ते मातोश्रीवर गेल्याचेही बोलले जाते. परंतु त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही. या सर्व राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली होणारी आज ठाकरे शिवसेनेची महत्त्वाची बैठक ठरणार आहे. तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी याला उपस्थित राहणार आहेत. बैठकीत काय निर्णय होणार याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.



