करक (राजापूर) येथे कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबट्या अडकला खुराड्यात

राजापूर : तालुक्यातील मौजे करक तांबळवाडी येथील आत्माराम गंगाराम कांबळे यांच्या नवीन बांधकाम चालू असलेल्या घराजवळ लोखंडी तारेच्या कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये बिबट्या अडकला असल्याची माहिती पोलीस पाटील करक यांनी वनपाल राजापूर यांना भ्रमणध्वनीवरून दिली. ही घटना सोमवारी घडली. या बिबट्याला वनविभागाने सुखरूप ताब्यात घेत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातही बिबट्याचा मनुष्यवस्तीकडे राजरोस वावर वाढलेला असताना राजापूर वनविभाग मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून सुसेगाद पहुडलेला आहे. राजापूर शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकणी बिबट्याने काहीजणांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत; मात्र त्या त्या वेळी वनविभागाचा गलथान कारभारच समोर आलेला आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रार अर्जांना आजपर्यंत राजापूर वनविभाग केवळ केराचीच टोपली दाखवण्याचे काम करत असून, झाड तोडीच्या पासेसना अग्रक्रम देत आहे. त्यामुळे राजापूर वनविभाग हा फक्त झाड तोडीसाठीच आहे का?त्यांना फक्त कोकणची वनसंपदा नष्ट कर्ण्यासाठीच शासनाने सेवेत घेतले आहे का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
बिबट्या अडकल्याची माहिती परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून, त्यांचे समवेत वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिस्थिती लक्षात घेऊन प्रथमदर्शी बिबट्या अडकलेल्या लोखंडी तारेच्या खुरड्याला ग्रीन शेड नेट गुंडाळून घेऊन पिंजरा लावण्यात आला. बिबट्या अडकला असलेल्या खुराड्याच्या लोखंडी तारा कापून त्याला पिंजऱ्यात सुरक्षित घेऊन पशुधन विकास अधिकारी राजापूर यांचेकडून तपासणी केली असता, सदरचा बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे वय एक ते दीड वर्ष असल्याची व तो सुस्थितीत असलेची माहिती पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी दिली.
ही कार्यवाही विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण प्रियांक लगड, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हा बिबट्या सुस्थितीत असल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. या कामगिरीसाठी रत्नागिरी, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, वनपाल राजापूर जयराम बावदाणे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक जालने व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, दीपक म्हादये, नितेश गुरव, अमित बाणे, निलेश म्हादये उपस्थित होते.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरीजा देसाई विभागीय वनाधिकारी रत्नागिरी यांनी केली आहे.



