मुख्य बातमी

पश्‍चिम घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यास करक गावाचा विरोध

राजापूर : विविधांगी निसर्गसंपदेने नटलेल्या पश्‍चिम घाटातील निसर्गसंपदेच्या जतन आणि संवर्धनासाठी शासनातर्फे पश्‍चिम घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (इको सिन्सेटीव्ह झोन) जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या गावांमध्ये तालुक्यातील करक गावाचा समावेश आहे; मात्र पश्‍चिम घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यास करक गावाने विरोध दर्शविला आहे. तसा गावच्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी ठराव केल्याची माहिती करकचे सरपंच सुरेश ऐनारकर यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील हरकतीच्या ठरावासह गावातील तीनशेहून अधिक ग्रामस्थांनी शासनाच्या वेबसाईटवरही हरकती नोंदविल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. निसर्ग संपदेने नटलेल्या पश्‍चिम घाटातील वनसंपदेचे जतन आणि संवर्धन होण्याच्यादृष्टीने केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयातर्फे पश्‍चिम घाटातील काही क्षेत्र पर्यावरण संवेदनशील झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये तालुक्यातील करकसह ५१ गावांचा समावेश आहे. पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्राबाबत शासनाने लोकांकडून हरकती मागविल्या आहेत. त्याप्रमाणे करक येथील ग्रामपंचायतीसह तिनशेहून अधिक लोकांनी आपल्या हरकती दाखल केल्याची माहिती सरपंच श्री. ऐनारकर यांनी दिली. इको सिन्सेटीव्ह झोनमुळे भविष्यात गावामध्ये नवनवीन घरे बांधणे, उपजीविकेसाठी उद्योग उभारणे यासाठी कोणत्याही प्रकारचे बांधकाम वा घरबांधणी करण्यासाठी वनविभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे. असे झाल्यास त्यावर हरकत घेतली जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी या झोनमुळे गावातील अनेक कृतींवर शासन प्रतिबंध करणार असल्याने त्याद्वारे गावचा विकास पूर्णपणे खुंटणार आहे.

त्याचवेळी इको सिन्सेटीव्ह झोनमुळे जंगलातील प्राणी गावात आणि गावातील माणसे शहराकडे वळतील. त्याचे परिणाम होवून वाढत्या लोकसंख्येने शहरे बकाल आणि गावे ओस पडतील. गावामध्ये उभारलेल्या अर्जुना धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याचा राजापूर आणि लांजा तालुक्यातील गावांमधील लोकांना शेतीसाठी उपयोग होवून लोकांना शेती करून उदरनिर्वाह करता येणार आहे. त्यादृष्टीने शेतकर्‍यांनी प्रकल्पासाठी जागा दिल्या आहेत. शेतीव्यतिरीक्त उर्वरीत जमीन व पर्यावरणपूरक साधनसंपत्तीचा उपयोग करीतही उदरनिर्वाह करणे शक्य होणार आहे.

गावच्या साधनसंपत्तीचा उपोयग करीत लघुउद्योगांची निर्मिती करून आर्थिक सुबत्ता साधणे शक्य होणार आहे. मात्र, पर्यावरण संवेदनशील झोन लागू झाल्यास या सार्‍याला पायबंद बसणार आहे. अशा प्रकारचे विविध तेरा मुद्द्यान्वये आक्षेप ग्रामसभेच्या ठरावामध्ये नमूद करण्यात आले आहेत. त्याचवेळी करक गावाला शासनाने इको सिन्सेटीव्ह गाव म्हणून घोषित केले मात्र, संबंधित कोणतीही मार्गदर्शक तत्वे व मार्गदर्शन गावातील लोकांसाठी केलेले नसल्याने लोकांमध्ये संभ्रमावस्था असल्याकडेही शासनाचे लक्ष या ठरावाच्या माध्यमातून वेधण्यात आल्याची माहिती श्री. ऐनारकर यांनी दिली.

या ठरावाची प्रत शासनाला सादर करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले पश्‍चिम घाटातील दुर्मिळ वनसंपदेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या पर्यावरण संवेदनशील झोनमध्ये करक गावाचा समावेश करून संपूर्ण गावामध्ये सरसकट पर्यावरण संवेदनशील झोन लागू करू नये. त्याऐवजी शासनाने आयुष मंत्रालयाच्या अधिकरार्‍यांना ग्रामपंचायतींमध्ये पाठवून दुर्मिळ नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास करावा. त्याबाबतची सविस्तर माहिती संकलीत करीत दुर्मिळ नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि संवर्धन करावे. त्यासाठी विशेष फंडाची तरतूद करावी अशी सूचनाही करक येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे शासनाला सूचित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button