पीफास विरोधी उपोषण सलग ८१ दिवस
लोटे पर्शराम येथील लक्ष्मी ॲारगॅनिक कंपनी ही युरोप आणि इटली येथील हद्दपार करण्यात आलेली केमिकल कंपनी. मानवी जीवनास अत्यंत घातक असणारे ”पीफास” रसायन बनविते. निसर्ग, पाणी जमिन यांत ते अगदी कायम स्वरुपी रहातात. For Ever या कंपनी विरोधात संगमेश्वरचे सामाजिक कार्यकर्ते ( कॅांग्रेसचे जेष्ट नेते) अशोक जाधव लक्ष्मी ॲारगॅनिक कंपनी गेटसमोर तब्बल ८१ दिवस उपोषणाला बसले आहेत. कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती व परिसरातील सर्व स्थानिकांच्या संयुक्त विद्यमाने हे ” स्टॅाप द डंप” आणि पर्यावरण व आरोग्य वाचवा पीफास हटवा ” लक्ष्मी केमिकल हटवा कोकण वाचवा”असे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा ८१ वा दिवस आला तरी आशेक जाधव या रणरणत्या उन्हात तेथे बसले आहेत. कसे बसले असतील या उत्सुकता त्यांना भेटण्यात होती.
लोटे पर्शरामचा घाट चढून वर गेले की इंडस्ट्री झोन सुरु होतो. थोडे पुढे डाव्या हाताला परशुराम एजन्सी एक्सेल फाटा आत गेल्यावर काही अंतर गेलो आणि लक्ष्मी ॲारगॅनिकचे गेट दिसले. या गेटच्या काही मिटर अंतरावर एक साध्या कापडाचा मंडप केलेला. त्या माळरानावरील रणरणते उन्हाच्या झळा पार होरपळून टाकणार्या, पडद्यामधून उन्हाचा रखरखीत मारा असह्य होणारा, तीव्र उन आणि घामाने अगांची लाहीलाही होणारी परिस्थिती मात्र या परिस्थितीत पांढरा शुभ्र सदरा -लेगा परिधान केलेले आणि अगदी हसतमुखाने आंदोलनस्थळी भेटणार्याचे स्वागत करणारे अशोक जाधवांचा उत्साह अचंबित करणारा होता.
पीफास हे युरोपीयन देशांनी बंद केलेले उत्पादन इटलीच्या व्हेनेटो प्रदेशातील त्रेव्हिसो गावात मिटेनी कारखान्यात १९६० पासून सुरु होते. येथील उत्पादीत रसरायनांच्या परिणाम २१ गावातील पिण्याचे पाणी प्रदुषीत झाले. कामगारांच्या रक्तातील पीएफएस पातळी विलक्षण धोकादायक वाढली. “Mamme No PFS” नावाचे आंदोलन उभे राहिले. इटली सरकारने कंपनीला ५१५ कोटी चा दंड अधिकाऱ्यांना तुरुंगवास ठोठावत कंपनी बंद केली. इटलीतील ही कंपनी थेट लक्ष्मी ॲारगॅनिकने अत्यल्प दरात विकत घेत लोट्याच्या माळावर आणली. सोबत ॲटोनिया नार्डोन या मुळ कंपनीच्या संचालकाला ( ज्याला इटलीत ६ वर्षे ४ महिन्याचा कारावास झाला होता. ) त्यालाही सोबत घेतले. भारत सरकारने या कंपनीला लोट्याच्या माळावर परवानगी दिली, हे वाचनात आले होते.
अशोक जाधव येथे कसे रहातात असा मला प्रश्न पडला. ते सांगत होते. ‘ कंपनीच्या गेटवर मोर्चा झाला त्यानंतर कंपनीच्या गेट समोर उपोषण करण्याचे आम्ही जाहिर केले, येथे येण्यापुर्वीच आम्हाला अटक करण्याच्या हालचालीचा सुगावा आणि एक तास अगोदरच येऊन बसलो. त्यावेळी चक्क उन्हात बसलो. समोर पोलीसांचे बॅरॅक लावले होते त्यावरच बॅनर लावले. पोलीस म्हणाले अटक होईल, आम्ही सांगितले करा अटक जामिन देणार नाही”
पोलीसांचे सततचे दडपण होते की आंदोलन एमआयडीसी, एमपीसी येथे करा कंपनीसमोर नको. पोलीस कंपनीच्या संरक्षणासाठी इतके का सजग ते काही समजले नाही?
रात्री घरी जाता का? …छे…छे….सलग ८१ दिवस येथून हललो नाही. रात्रीही येथेच झोपतो. सोबतीला नभीचा चंद्र आणि डासांची गुणगुण . या आंदोलनामुळे लोक म्हणू लागले येथील कंपन्या जो रात्रीच्या वेळी प्रचंड धूर आणि दुषीत गॅस हवेत सोडत होते तो आता कमी झाला आहे. माझ्या सोबत कोकण नागरी संघर्ष समितीचे राजेंद्र आंब्रे, रविंद्र गोळवणकर, सचिन चाळके , अविनाश आंब्रे, दिलीप घाग ( लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती)आणि शेकडो कार्यकर्ते आहेत. नुकताच अभूतपुर्व मोर्चा कंपनी गेटवर काढण्यात आला. या परिसरातील लोकांचे उत्तम सहकार्य आहे. मात्र ज्यांनी निर्णय घेणे यांत लक्ष घालणे आवश्यक आहे. ते राजकीय नेते मात्र जाणिवपुर्वक येथे लक्ष देत नाहीत. काही जणांची इच्छा असूनही ते व्यक्त होत नाहीत कारण मुख्यमंत्र्यांचा अदृष्य हात या प्रकल्पा मागे असल्याचे सांगतात.
उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी तर पीफास उत्पादन कोणत्याही प्रकारे होऊ दिले जाणार नाही. पर्यावरणाच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड होणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती. त्याचे सध्य वास्तव काय आहे? या प्रश्नावर अशोक जाधव आणि त्यांचे सहकारी एक मिश्किल हास्य करतात. सारेच गप्प आहेत !!!!!
आपल्याला कोणाकोणाचे फोन आले
जेष्ठ अभिनेते पर्यावरण रक्षक नाना पाटेकर यांचा फोन उपोषणाची आपूलकीने माहिती समजून घेतली. काय करायला पाहिजे विचारले तर कंपनीने दोन ओळीचे पत्र द्यावे उत्पादन बंद करत आहोत. उपोषण मागे घेऊ…..नंतर काही घडामोडी झाल्या म्हणे आणि त्यांचा पुन्हा फोन नाही.
येथील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी हा प्रश्न मांडावा अशी इच्छा होती. परंतू त्यांनी लोटे येथे कॅन्सर हॅास्पिटलची मागणी लावून धरली आहे. उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांनी या प्रश्नावर सात वेळा पत्रकार परिषदा घेतल्या परंतू कंपनी उत्पादन चालूच आहे. कंपनीनेच येथे पीफास उत्पादन सुरु आहे हे कंपनी प्रतिनिधीनीच पत्रकार परिषदेत जाहिर केले आहे.
काँग्रेस खासदार राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांचेकडे प्रश्न पाठविला….. राज्यसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला, पीफास बनविण्याचा देशात कायदाच नाही…..हर्षवर्धन सकपाळ उपोषण स्थळी आले होते. विधानसभेत आर आर आबा पाटील यांच्या मुलांने हा प्रश्न उपस्थित केला. रामदास कदम यांचे चिरंजीव सिध्देश कदम, प्रदुषण महामंडळाचे अध्यक्ष आहेत. यापुर्वी रामदास कदम पर्यावरण मंत्री होते. त्यांच्या काळातच लोटे केमिकल झोन विस्तारला दाभोळ खाडी उध्वस्त झाली. आता त्यांच्याकडून अपेक्षाच नाही.
हा विनाश फक्त लोटे पुरता मर्यादित नाही तर पुर्ण कोकण उध्वस्त करणारा आहे. हे का समजून घेत नाहीत हा प्रश्न आहे!
सीइपीटीतून खाडीत प्रक्रिया नकरता सोडल्या जाणार्या पाण्यापुरता मर्यादीत नाही तर कधीही नष्ट न होणारे (FOR EVER) हे रसायन आहे. १ किलो पिफास बनविण्यासाठी २० लिटर पाणी तयार होते. येथे खाली पाइप आहेत. सीइटीपी ची पाइपलाईन अद्याप येथे जोडलेली नाही ते म्हणतात. एक थेंब पाणी वाया घालवत नाही सारे तळोज्याला नेतो. तळोज्याला ते पाणी नष्ट करण्याची सिस्टीम आहे असे म्हणतात,परंतू देशात अशी सुविधा नाही. पीफास नष्ट करण्यासाठी १२०० डीग्री तपमान लागते. आम्ही म्हणतो टॅंकर नेतांना आम्हाला त्या गाड्यांची ट्रान्सपोर्ट ची रिसीट द्या. कोणत्या गाडीने गेले ते द्या. हे पाणी नेण्यासाठी स्पेसीफीक टॅंकर सुविधा लागते.
८५०० मे. टन वर्षाला उत्पादनाचे टार्गेट आहे. विधानसभेत पंकजा मुंडे यांनी सांगितले आतापर्यत ३२ मे. टन पीपास तयार झाले आहे. ६.६ लाख लिटर पाणी तयार होते. यांतील पाच टँकर सीइपीटीत सोडले. कंपनीच्या पीण्याच्या पाण्यात मीक्स झाले. आमचा लाईट घालवायचे आणि टॅंकर पळवायचे एका टॅंकरचा पाठलाग केला. त्याचा पाठपुरावा केला. लोकानी पकडून सॅम्पल काढून घेतले. त्याचा रिपोर्ट येईल. डाबंरीवर पडलेले पीपास पकडले. जगबुडीच्या पुलावर टॅंकर उलटा झाला. नदीत प्रदूषीत पाणी पडू लागले. सरकारला जीआर काढावा लागला…. पीण्याचे पाणी वापरु नका, तोच टॅंकर पाण्याला …. त्यातून च पीण्याचे पाणी भरुन लोकांना वाटत होता. ११ लाख लिटर पाणी कोठे गेले? लोटे एमआयडीसी पीपासचा एकमेव जागतिक हब करण्याचा प्रयत्नआहे.
अशोक जाधव पोटतिडकीने एक एक प्रश्न मांडत रहातात. कोकणातील राजकीय धुरंधर नेतृत्व तेथे लक्षही देत नाहीत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातीलही. मात्र अशोक जाधव आणि त्यांच्या सहकार्यांचे ८५ दिवस उलटून गेले तरी उपोषण सुरु आहे. सामान्य जनतेने हा प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे.
✍️अभिजीत हेगशेट्ये



