मुख्य बातमी

समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

रत्नागिरी : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत आज (१ ऑक्टोबर) सायंकाळी ४ वाजता नाचणे येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये रत्नागिरी जिल्हयातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकाना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/ उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातुन ३ हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. पात्र ज्येष्ठ लाथार्थ्यांना त्याच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभुत साधने उपकरणे खरेदी करता येतील. त्यामध्ये चष्मा, श्रवणणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर आदी साधनांचा समावेश आहे.

रत्नागिरीतील सर्व धर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देशातील महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांची मोफत यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योनजा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील एकुण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या योजनेअतंर्गत निर्धारित तीर्थक्षेत्रापैकी एका यात्रेसाठी पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ मिळणार आहे. तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास आदी बाबींचा समावेश आहे. कायदे व योजना विषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन आदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button