मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी संतोष नलावडे यांची नियुक्ती
निवडीचे पत्र पक्षाचे नेते तथा मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी संतोष नलावडे यांची नुकतीच निवड झाली असून राज ठाकरे यांनी पत्राद्वारे नियुक्ती जाहीर केली आहे. या निवडीचे पत्र पक्षाचे नेते तथा मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नलावडे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी संतोष नलावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांचा सत्कार केला.
गेल्या काही वर्षांपासून संतोष नलावडे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन मनसे पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेत आहेत. याची दखल घेऊन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी संतोष नलावडे यांच्यावर गेल्या काही वर्षांपूर्वी चिपळूण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. यानंतर उत्तर रत्नागिरी जिल्हा सचिव पदी नेमणूक केली गेली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या राज्य चिटणीस पदी निवड करण्यात आली होती.
आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतोष नलावडे यांच्यावर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून मोठा विश्वास दाखवला आहे. एकंदरीत नलावडे हे गेल्या काही वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने ठाकरे यांनी मोठी जबाबदारी टाकली आहे. या निवडीबाबत संतोष नलावडे म्हणाले की, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे व मनविसे अध्यक्ष युवा नेते अमित ठाकरे आणि वरिष्ठांनी आपली उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी निवड करून जो दाखवला आहे तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नेते शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे, राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
या निवडीबद्दल नलावडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




