Uncategorized

कोकणात जागा लढविण्यास इच्छुक : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

२०१९ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माझा सल्ला ऐकला असता तर आजची ही वेळ आली नसती : नारायण राणे यांनी कधी हिंदू - मुस्लिम भेद केला नाही

रत्नागिरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही १८ जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत, असे तिन्ही वरिष्ठ नेत्यांना सांगितले असून त्यातील १२-१३ जागा आम्हाला मिळतील अशी अपेक्षा आहे. कोकणातही कोणतीही एक जागा मागितली असून, ठाणे, रायगड यापैकी कोणत्या जागेसाठी आमचा विचार केला जातोय ते बघायचे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. जागा वाटपासाठी चर्चा सुरू असून, उरल्या सुरलेल्या कोणत्या जागा आम्हाला दिल्या जातात ते बघू, असे विधानही त्यांनी केले.

रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज (२० सप्टेंबर) रत्नागिरी दोऱ्यावर होते. यावेळी शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतानाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ही कौतुक केले. या योजनेला महाराष्ट्रभरातून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकारांच्या एका प्रश्नांला उत्तर देताना ते म्हणाले, ते म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलेल्या प्रस्तावाचा विचार करायला हवा होता. अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायला पाहिजे होते. पण त्यावेळी माझे ऐकले असते तर आज शिवसेनाही त्यांची असती आणि धनुष्यबाण ही त्यांच्याच हातात असता. आताची वेळ आली नसती. उद्धव ठाकरे भाजप बरोबर असायला हवे होते. या सर्व गोंधळात अडीच वर्ष सोडा पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेलाच मिळाले. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले होते; पण त्यावेळी शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. मात्र ही मागणी भाजप नेतृत्वाने धुडकावली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर गेले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते. त्या आधी भाजप आणि शिवसेनेने अडीच- अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे असा प्रस्ताव आपण दिला होता, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. त्या शिवाय भाजपने तीन वर्ष आणि शिवसेनेने दोन वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यावे असा तोडगाही सुचवला होता.

पण त्यावेळी भाजपने आपला हा सल्ला ऐकला नाही. आपण दिलेला सल्ला जर त्यावेळी भाजपने ऐकला असता तर ही वेळ आता आली नसती अशा शब्दात आठवले यांनी भाजपला सुनावले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या नादात पाचही वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळाले. पहिले अडीच वर्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी अडीच वर्ष शिंदेंच्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुती भक्कमपणे निवडणुकीला सामोरे जाईल असे ते म्हणाले.

यावेळी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बद्दलही मत व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीने थोडे लवचिक धोरण घेणे गरजेचे आहे. त्यांना २०१४ साली मते मिळाली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सर्व जागा लढल्या पण जिंकल्या एकही नाही त्याचा उपयोग काय असा प्रश्नही त्यांनी केला. प्रकाश आंबेडकरांनी एनडीए बरोबर यावे अशी ऑफरही त्यांनी दिली. तसे झाल्यास माझे मंत्रीपद त्यांना देण्याची शिफारस आपण करू असेही आठवले यावेळी म्हणाले. आपल्या पक्षाचा एकही खासदार लोकसभेत नसताना आपण केंद्रात मंत्री आहोत हे त्यांनी आंबेडकरांना बोलून दाखवले.

नीलेश, नीतेश राणे हे तरुण आणि उमेदीचे असल्याने ते असे बोलत आहेत; मात्र खासदार नारायण राणे यांनी कधी हिंदू- मुस्लिम भेद न करता सर्वांना सामावून घेतले, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी मराठा आरक्षणावरही त्यांनी भाष्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button