
नृत्य साधना ही भारतीय संस्कृतीची समृद्ध विरासत आहे. यात शारीरिक, मानसिक क्रिया- प्रक्रियांचा एक सुरेल संगम आविष्कार प्रत्येक ताल आणि नाद सोबत प्रकटत होत राहतो. एकाग्रतेचे उत्कट प्रकटन आणि लवचिक आणि कमनीय बांधणीची नयनाच्या प्रत्येक कटाक्षातून चेहऱ्यावर प्रत्येक छटेतून उमटत आणि उलगडत जाणारा कथानक मंत्रमुग्ध करत राहते. भावना प्रधान आणि चमत्कार प्रधान तत्त्वांचा समावेश असणारा ‘कथ्थक’ या शास्त्रीय नृत्यशैलीतील गत, तोडे, नायक-नायिका भेद, तत्कार, घुंगुराचा नाद, तालवादकांसह नर्तकाची जुगलबंदी अशा विलक्षण सौंदर्याविष्काराचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी प्राप्त झाली ती ललित कला अकादमीच्या प्राचार्या सौ. शिल्पा भिडे-मुंगळे यांच्या विरासत या संगीत नृत्य मैफलीच्या निमित्ताने.

स्व. बाळासाहेब पित्रे हे देवरूखच्या मातीतील एक विलक्षण प्रतिभावंत व्यक्तिमत्व. औद्योगिक क्षेत्रात जागतिक पातळीवर उंच भरारी घेत असताना देवरूख या आपल्या मुळगावाची नाळ ते कधीच विसरले नाहीत तर देवरूखवर त्यांनी नितांत प्रेम केले. येथे वैद्यकीय क्षेत्रातील साधने निर्मितीचा अत्यंत कौशल्याधारीत कारखाना सुरू करत या भागात रोजगाराची सुविधा निमाण केली. विविध सामाजिक उपक्रमांना बाळासाहेब यांचा परिसस्पर्श हा उर्जशील होता. यातीलच एक स्वप्न त्यांच्यासोबत विमलताई यांनी पाहिले ते नृत्य संगीत कलेला प्रोत्साहन देणारे. यांतून ”ललित कला अकादमीची” स्थापना २००८ साली देवरूख येथे झाली. जागा ते अद्ययावत साधनसामुग्री याची तजवीज करत बाळासाहेबांनी ललित कला अकादमी उभारताना जे स्वप्न पाहिले ते उदात्त उज्ज्वल होते. माणसे हेरणे त्यांची अचूक निवड करणे हा बाळासाहेबांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचा विशेष भाग होता. शिल्पा मुंगळे या विलक्षण प्रतिभावंत नृत्यांगना कलाकार यांच्या हाती या कला ॲकडमीची सूत्रे त्यांनी सोपविली. गेल्या १७ वर्षांच्या कालावधीत शिल्पा मुंगळे यांनी कला अकादमीच्या माध्यमातून देवरूख या तशा ग्रामीण भागात नृत्य आणि संगीताची आवड आणि रुची जागृततेचे अभियान अत्यंत तन्मयतेने राबविले आहे. याचा परिणाम म्हणजे आज अनेक मुली कथ्थक विशारद झाल्या आहेत. अनेक मुली मुले कथ्थक नृत्याचे पाठ मोठ्या उत्साहाने शिकत आहेत. नृत्य कला जागराचे अभियान उभारणे आणि त्यात सातत्या राखून ठेवत ते पुढे नेणे हे अत्यंत चिकाटीचे काम आहे. फक्त नृत्य, संगीत शिक्षण यापुरते हे कार्य मर्यादीत न राहता या प्रशिक्षणार्थींना उच्च परीक्षा मान्यता मिळविण्यासाठी तयार करणे याची काळजी येथे घेतली जाते.
नृत्य ही फक्त कलाच नाही, तर आजच्या ग्लोबल जगतात ते एक उत्तम प्रोफेशन होऊ शकते याचे भानही ही अकादमी देत असते. या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा आणि देश परदेशात मुलांना नृत्य कार्यक्रम आणि स्पर्धा यातून संधी मिळत आहे. हे विशेष आहे. नृत्य प्रशिक्षण घेत त्यात पारंगत होत असताना हे कलाकार आपल्या अन्य अभ्यासक्रमातही पारंगत आहेत. यातील काही मुली चार्टर्ड अकाउंटं तर काही इंजिनीअर आदी उच्च विद्याविभूषित आहेत.
नृत्य आणि संगीत हा भारतीय परंपरेचा अत्यंत समृद्ध असा वारसा आहे. त्यातील कथ्थक नृत्य प्रकारचा इतिहास मोठा मजेशीर आहे. पूर्वी मंदिरातून पौराणिक कथा सांगितल्या जात. नट मंडळी या कीर्तनातून नृत्य करत, “कसली नाच काम करता यातून काय प्रबोधन देत आहात?” असा प्रश्न उपस्थित करत या नटमंडळीवर त्या काळातील समाजाने बहिष्कार टाकला. त्यातून स्वतःच नृत्य करत कथा सांगण्याचा प्रकार सुरू झाला म्हणून त्याला ‘कथ्थक’ म्हणतात. या नृत्य प्रकारात पदलालीत्य अत्यंत महत्त्वाचे असते. यातील एकाच जागी स्थिर असणाऱ्या पायांची जमिनीपासून किंचित वर उचलत होणारी हालचाल ताल नोंदवत असताना नृत्यांगनेचा चेहऱ्यावरील प्रत्येक हालचाल आणि हातांच्या विशिष्ठ रचना त्याला आकार आणि आलाप देणाऱ्या करंगळी, अनामिका, मध्यमा, तर्जनी, अंगठा या बोटांच्या विशिष्ठ हालचाली, डोळे, भुवया आणि भालावरील उमटणाऱ्या विविध रेषांचे, भावनांचे प्रकटीकरण यात राग, लोभ, प्रेम, मत्सर, दुःख, वेदना आदी विविध भावनांच्या छटा उमटवित ही मुक कथा फक्त अभिनयाच्या आणि नृत्यांच्या वेगाने पुढे जात रहाते.

रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख हे गाव साहित्य, कला, सामाजिक, सांस्कृतिक आणि शिक्षण या क्षेत्रात सदैव अग्रेसर आहे. दलित आणि बहुजन चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते झुणकाभाकरफेम, नाटककार समतानंद गर्दे, जमनालाल बजाज पुरस्कार विजेत्या थोर सामाजिक कार्यकर्त्या मातृमंदिर संस्थापिका इंदिराबाई (मावशी) हळबे, समाजसुधारक पार्वतीबाई आठवले, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते शंकरशेठ सार्दळ, अरुण आठल्ये, बाळासाहेब पित्रे या नावांसोबत शिवराज्यातील जेष्ठ कवी ”कवी कलश” आणि अनेक व्यक्तिमत्त्वांच्या योगदानातून येथील सांस्कृतिक, साहित्यिक, सामजिक कलोपासना वृद्धिंगत झाली आहे. फार मोठा वारसा या भूमीला आहे आणि आजही तो वारसा पुढे नेण्याचे काम येथील विविध संस्था सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.
मूळ देवरुखकर म्हणून मला या मातीचा सदैव अभिमान आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा या निमित्ताने नृत्यमंचावर अनेक मान्यवरांसोबत सहभाग घेता आला. त्यात बाळासाहेबांचे चिरंजीव आणि ज्येष्ठ उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अजय पित्रे, ”ओलीमाती” ब्रॅन्डच्या निर्मात्या कमर्शियल आर्टिस्ट भारती पित्रे, फार्मासिटिकल क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक वैजनाथ जागुष्टे, देवरुख शिक्षण प्रसारक संस्था अध्यक्ष सदानंद भागवत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुस्तू आर्ते, नेहा माने, वेदा फडके, मृणाल शेट्ये उपस्थित होते.
देवरूखसारख्या गावात नृत्य – संगीत याचे कलादालन सुरू करावे ही बाळासाहेब पित्रे यांच्या संकल्पना आणि दूरदृष्टी या परिसरातील कलात्कतेला, येथील गुणवत्ता आणि कलागुणांना संधी देणारी होती. या कल्पकतेला सौ. शिल्पा मुंगळे यांच्या कष्टाची, मेहनतीची आणि अखंड साधनेची साथ लाभली. शिल्पा मुंगळे यांनी आपली पूर्ण कलासाधना या अकादमीसाठी सर्वस्वी समर्पण केली आहे. या नृत्य- संगीत कलादालनाच्या अखंड साधनेत त्यांच्या समर्पणाच्या समीधा अत्यंत महत्वाचे योगदान देत आहेत. स्वतःला मातीत गाडून घेणारी माणसे जेथे तयार होतात तेथेच निर्मितीचा अंकुर फुटत असतो. आज ‘ललित कला अकादमी’ हे कालदालन भविष्यातील शेकडो हजारो कलाकारांचे उगमस्थान आहे. देवरूख भविष्यात या कलादालनातील कलाकारांच्या नावानेही ओळखले जाईल, असा आशावाद जागविणारी ही घटना निश्चितच विशेष दखल घेणारी आहे.



