शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण करण्यासाठी १७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

रत्नागिरी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु, अद्याप आधार प्रमाणिकरण न केलेल्या शेतकऱ्यांनी १७ सप्टेंबरपर्यंत नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करून आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व बँकांनी प्रोत्साहनपर लाभासाठी २८ हजार ८७६ कर्जदार शेतकऱ्यांचे खाती अपलोड केली आहेत. त्यापैकी १७ हजार ९४९ कर्जदार शेतकऱ्यांचे खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त झाले आहेत, त्यापैकी १७ हजार ३१८ आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले असून, १० सप्टेंबरअखेर ६२९ कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करणे प्रलंबित आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केल्यापैकी १६,२६७ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ३२.४२ कोटी इतकी रक्कम शासनामार्फत अदा करण्यात आली आहे. या याजनेंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे बाकी असलेल्या सर्व ६२९ जणांनी १७ सप्टेंबरपर्यंत नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करून आधार प्रमाणिकरण करून घ्यावे.
मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी वारस नोंद करून घ्यावी. या योजनेंतर्गत लाभार्थी असलेल्या मयत शेतकऱ्याचा डेटा वगळणे आणि त्याऐवजी त्याचे वारसांची माहिती अपलोड करण्याबाबत कार्यपध्दती निश्चित केल्याप्रमाणे संबंधित बँकेमार्फत १७ सप्टेंबरपर्यंत मयत सभासदांची माहिती वगळण्याबाबत आणि १८ सप्टेंबर ते २६ सप्टेंबरपर्यंत मयतांचे वारसांचा डेटा अपलोड करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.
संबंधित मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी आपलल्या बँक शाखेत संपर्क करून आवश्यक माहिती देऊन वारस नोंद करण्यासाठी कर्जदार शेतकऱ्याचा मयत दाखला, वारसाचे आधार कार्ड, वारसाचा मोबाईल क्रमांक, वारसाचे बँक खाते क्रमांक आदी माहिती देण्यास सहाय्य करावे म्हणजे लाभ मिळणे सुलभ होईल.



