मुख्य बातमी

शिक्षणमंत्री, पालकमंत्री यांच्या आश्वासनामुळे भंडारी समाज संघाचे उपोषण स्थगित

रत्नागिरी : पालकमंत्री ना.उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून भंडारी समाज संघाने आपले बेमुदत उपोषण तुर्तास स्थगीत केले आहे.

रत्नागिरीतील श्री पतितपावन मंदिर भक्तीभूषण दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने बांधले आहे. महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता आठवीच्या इंग्रजी, मराठी पाठ्यपुस्तकात हे मंदिर वि. दा. सावरकर यांनी बांधल्याचे प्रसिद्ध केले आहे. रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष श्री.राजीव कीर यांच्या मार्गदर्शनाखाली अठरापगड समाजाच्या प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करून पाठ्यपुस्तक मंडळाचा निषेध केला. खोटा इतिहास तात्काळ काढून टाकण्याची मागणी करण्यात आली.

 

पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शालेय शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांच्याशी उपोषणकर्त्यांना मोबाईलवरून बोलून चर्चा घडवून आणली. खोटा इतिहास काढून टाकून खरा इतिहास पूर्ववत करण्याचे आश्वासन ना.दादा भुसे यांनी दिल्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले. परीट समाजाचे ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर कासेकर यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळामार्फत श्रीमान भागोजीशेठ कीर, संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांचे चरित्र प्रकाशित करण्याची ग्वाही आमदार सामंत यांनी दिली.

माजी आमदार राजन साळवी, चंद्रहास विलणकर, अंकुश कीर, अरूणा शिरधनकर, निवृत्त तहसीलदार राजेंद्र बिर्जे, दिलीप भाटकर, प्रवीण जोशी, गजानन करमरकर, प्रभाकर कासेकर, रघुवीर शेलार, बी. टी. मोरे, अण्णा लिमये, सुरेंद्र घुडे आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून तीव्र भावना व्यक्त केल्या. पतितपावन मंदिराविषयी खोटा इतिहास प्रसिद्ध करणाऱ्या पाठ्यपुस्तक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button