मुख्य बातमीराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

वंचितच्या जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षकांची घेतली भेट 

विलास जाधव यांच्या हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी

रत्नागिरी : वंचित बहुजन विकास आघाडीचे उत्तर जिल्हाध्यक्ष विलास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर रविवारी (१७ नोव्हेंबर) दुपारी गुहागर तालुक्यातील नरवण येथील सावली हॉटेलच्या बाहेर तीन अज्ञात व्यक्तींनी जीवघेण्या स्वरूपाचा हल्ला केला तसेच त्यांची गाडीचे देखील नुकसान केले. याबाबत वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग २०२४ लोकसभेचे उमेदवार काका जोशी यांच्यासह जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची आज (१८ नोव्हेंबर) भेट घेऊन हल्लेखोरांना अटक करण्यासंदर्भात निवेदन सादर केले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष हे गुहागर तालुक्यातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. तिथे काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर भ्याड जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात मारहाण करून त्यांच्या गाडीचे नुकसान केले आहे. हल्ला हा राजकीय सूडबुद्धीतून केला आहे. याचे महत्त्वाचे कारण जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी काही दिवसांपूर्वी गुहागर मतदारसंघातील उमेदवार भास्कर जाधव हे त्यांच्या प्रचारादरम्यान एका सभेत बौद्ध समाजाला जातीवाचक अपमानित वक्तव्य केले होते आणि या विरोधात कारवाई संदर्भात आपल्याकडे तक्रार दाखल आहे; मात्र अजूनही आमदार महोदयांवर कारवाई नाही. मात्र आंदोलन करणाऱ्या आमच्या जिल्हाध्यक्ष यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहे. हा कुठला न्याय? असा सवाल यानिमित्ताने पत्रकातून उपस्थित केला आहे.

यापुढे, जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर राजकीय द्वेशातून हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांसह मास्टरमाईंडचा लवकरात लवकर शोध घेऊन तातडीने अटक करावी अन्यथा आमचे वंचित बहुजन आघाडी संपूर्ण रत्नागिरी जिल्हा आचारसंहितेच्या काळात रस्त्यावर उतरल्यास यास शासन-प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. असा इशारा देत जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. या हल्ल्याच्या घटनेच्या तपासावर मी स्वतः लक्ष केंद्रित केले आहे. सखोल चौकशीची आदेश देखील देण्यात आले आहे, असे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. हे निवेदन सादर करताना २०२४ लोकसभेचे उमेदवार काका जोशी, दक्षिण जिल्हाध्यक्ष गौतम गमरे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा महासचिव मुकुंद सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button