अणूस्कूरा घाटातून तिसऱ्या दिवशी एकेरी वाहतूक सुरू

राजापूर : अणुस्कूरा घाटातील रस्त्यामध्ये मातीच्या ढिगार्यासोबत आलेल्या मोठ-मोठ्या दगडांनी बांधकाम विभागाच्या चांगलाच नाकी दम आणला आहे. छोट्या-मोठ्या दगडांपैकी काही दगड फोडण्यात बांधकाम विभागाला यश आले असून, तिसर्या दिवशी दुपारनंतर घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. सायंकाळी उशीरा दुहेरी वाहतूक सुरू होण्याचाही अंदाज वर्तविला जात आहे; मात्र, अद्यापही घाटामध्ये दोन-तीन मोठे दगड रस्त्यामध्ये शिल्लक राहीलेले असून ते फोडण्याचे आव्हान अद्यापही कायम ठाकलेले आहे.
शनिवारी (ता. २४) अणुस्कूरा घाटामध्ये पहाटेच्या दरम्यान दरड कोसळ्याची घटना घडली होती. त्यामध्ये मातीच्या ढिगार्यासह मोठ-मोठे दगड रस्त्यामध्ये आल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता. रस्त्यामध्ये आलेल्या मातीच्या ढिगार्यासह दगड हटविण्यासाठी तीन दिवसांपासून बांधकाम विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यामध्ये माती आणि छोटे-छोडे दगड हटविण्यात बांधकाम विभागाला यश आले. मात्र मोठ-मोठे दगड फोडण्याचे आव्हान ठरले होेते. त्यातून गेल्या दोन दिवसांपासून घाटामार्गातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली होती. आज तिसर्या दिवशी शिल्लक राहिलेल्या छोटे-मोठे दगड फोडण्याचे पुन्हा नव्या दमाने बांधकाम विभागाने काम सुरू केले होते. त्यामध्ये छोटे आणि बर्यापैकी मोठे दगड फोडण्यात आणि रस्ता मोकळा करण्यात बांधकाम विभागाल यश आले आहे.
आज सायंकाळपासून घाटमार्गातील गेल्या दोन दिवसांपासून ठप्प असलेली वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीमध्ये घाटमार्गे एकेरी वाहतूक सुरू झाली असून अद्यापही दगड फोडण्याचे काम कायम सुरू आहे. त्यामुळे सायंकाळी उशीरा घाटमार्गे दुहेरी वाहतूक सुरू होण्याचा अंदाज बांधकाम विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, अद्यापही रस्त्यामध्ये मोठे दोन ते तीन दगड फोडण्याचे काम शिल्लक असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.



