मुख्य बातमीराजकीय

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाकडे महायुतीतील मित्रपक्षांची पाठ

रत्नागिरी : काल (२१ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानअंतर्गत माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमाकडे महायुतीच्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र बघायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आमंत्रण न दिल्याच्या रागातून बहिष्कार टाकला, तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दौरा रद्द केल्याने स्थानिक नेतेही कार्यक्रमाला आले नाहीत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. महायुतीने राबविलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाबरोबरच विमानतळ टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन आणि लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय नामकरण सोहळा आणि उद्घाटनाचा कार्यक्रमही होता. मात्र या सर्व कार्यक्रमांचे कोणत्याही पदाधिकाऱ्यांना रितसर आमंत्रण न दिल्याच्या निषेधार्थ संपूर्ण कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांचा दौरा ही नियोजित होता; मात्र दोन दिवसांपूर्वी रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. या विषयावर मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगल्याने भाजप नेत्यांनीही कार्यक्रमावर बहिष्कार घातला.

महायुतीचा धर्म शिवसेनेकडून पाळला जात नसल्याने मित्र पक्ष नाराज आहेत. येत्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता मित्रपक्षांची नाराजी शिवसेनेला किती भारी पडेल हे येणारा काळच ठरवेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button