बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी महिलांची गर्दी
बँकेत इतर कामासाठी आलेल्या ग्राहकांची गैरसोय

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होऊ लागले आहेत; मात्र खातेधारक महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्याने अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यात अडचण निर्माण होत आहे. त्यासाठी आता महिलांनी एकच गर्दी केल्याचे चित्र रत्नागिरीतील सर्वच बँकांमध्ये बघायला मिळत आहे; मात्र यामुळे बँकेत इतर कामासाठी आलेल्या ग्राहकांची गैरसोय होत असून, त्यांना आपले काम न करता तसेच परतावे लागत आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या एकत्रित ३ हजार रुपयांचा हफ्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधनपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असून, निकषानुसार असलेले अर्ज योजनेसाठी पात्र ठरले आहेत. यातील निम्म्याहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. मात्र अनेक महिला अजूनही पैसै खात्यात जमा होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
पैसे खात्यावर जमा होण्यासाठी संबंधित महिलेचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे; मात्र अनेक महिलांनी आपले खाते आधारशी लिंक केले नसल्याने आता योजनेचे पैसे मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी आता या महिलांनी बँकेत धाव घेतली असून खाते लिंक करण्यासाठी रत्नागिरीतील प्रत्येक बँकेत महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसत आहेत. बँकेतील कर्मचारीही योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याने लाभार्थी महिलांना प्राधान्याने सेवा दिली जात आहे. मात्र या गर्दीमुळे याव्यतिरिक्त इतर कामांसाठी बँकेत येणाऱ्या ग्राहकांना बँक सेवा देण्यात कमी पडत असल्याचे चित्र आहे. अनेक ग्राहक बँकेतील गर्दी पाहूनच बँकेत जावे की नाही या द्विधा मनःस्थितीत असून, खाते लिंक करण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी बँकेत गेलेल्या ग्राहकांना थांबण्याची किंवा नंतर येण्याची विनंती केली जाते आहे.



