मुख्य बातमीशैक्षणिक

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य अभ्यासा : प्रा. पूर्णिमा सरदेसाई

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

रत्नागिरी : “अण्णा भाऊ साठे हे अतिशय प्रतिभावान साहित्यिक होते आणि प्रतिभेला जात, धर्म, लिंग याचे कुंपण नसते हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. शोषित वर्गाबद्दल आत्मियता त्यांच्या लेखणीतून दिसून येते. जे वास्तवचित्रण आहे, प्रेरणादायी आहे तेच त्यांनी आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे साहित्य अभ्यासा”, असे आवाहन प्रा. पूर्णिमा सरदेसाई यांनी विद्यार्थांना केले.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे यांची जयंती आज (१ ऑगस्ट) एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात साजरी करण्यात आली. यानिमित्त वाङ्‍‍मय मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, प्रा. पूजा मोहिते, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, वाङ्‍‍मय मंडळाच्या सदस्या प्रा. निकिता नलावडे, प्रा. स्वरा खामकर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. सरदेसाई म्हणाल्या, “आजूबाजूला शोषित वातावरणात वावरणारे लोकच त्यांच्या कथा, कादंबऱ्यांचे नायक- नायिका आहेत. त्यांनी शोषित, पीडित, दलित, स्त्रिया यांना आपल्या साहित्यातून मांडले शिवाय फकीर, गारुडी आणि इतर अनेकांना आपल्या साहित्यात स्थान दिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत साहित्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम त्यांनी केले. तमाशाचे नामकरण लोकनाट्य असे करतानाच यातील स्त्रियांचा सन्मान, आदर वाढवला. स्वातंत्र्य मिळाले पण लोकांना अन्न नाही अशी खंत त्यांना होती आणि ते विचारण्याचे धाडस त्यांनी आपल्या लेखणीतून केले.”

आपल्या मनातील दुःख घेऊन जगणे हे एकप्रकारचे मरणच आहे आणि असे जगणारे अण्णाभाऊ नव्हते, असे सांगतानाच प्रा. सरदेसाई यांनी शालेय, विद्यापीठ स्तरावर तसेच पीएचडीसाठी अण्णांचे साहित्य अभ्यासाला असून, त्यांच्या साहित्याचे भारताबाहेरील २७ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे एवढी त्यांच्या लिखाणाची ताकद असल्याचे नमूद केले. अण्णांच्या साहित्याची दखल संपूर्ण जगाने घेतली असली तरी आपल्या देशात त्यांच्या साहित्याची उपेक्षाच झाली, अशी खंत ही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

प्राचार्या डॉ. जगदाळे म्हणाल्या, “आधुनिक मराठी साहित्यामध्ये आजपर्यंत अनेक विचार प्रवाह आणि साहित्यप्रवाह उद‌यास आले. अशा प्रवाहांनी मराठी साहित्याला अनुभवाचा मोठा वारसा देऊन समृ‌द्ध केले आहे; पण ज्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्रय असताना, कसलाही सांस्कृतिक, विद्वत्तेचा तसेच परिवर्तनाचा वारसा नसताना अवघा दीड दिवस शाळेत जाऊन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी मराठी साहित्यामध्ये लेखणीच्या रूपाने वास्तववादी जीवनानुभवाचे मोठे विश्व लेखनाच्या माध्यमातून साकारले आहे. आपल्या लेखणीच्या बळावर सामान्यातील सामान्य माणसाला आपल्या साहित्याचा नायक करून हा महापुरुष साहित्यविश्वात भल्याभल्या प्रस्थापित साहित्यिकांत आपले नाव कमावतो. आपल्या अनुभवाच्या जोरावर पुढे साहित्यसम्राट, बहुजन चळवळीचा नायक होतो ही एक अद्वितीय घटना म्हणावी लागेल. त्यांचे एकूण साहित्य आधुनिक समाज आणि साहित्यामध्ये क्रांती करणारे ठरले आहे. हा त्यांचा साहित्यिक क्रांतीचा इतिहास आपल्या देशाबरोबर जगाला कल्याणकारी मानवनेच्या परिवर्तनाचा संदेश देणारा आहे.”

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित चित्रफित विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. प्रास्ताविक एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुशील साळवी यांनी केले. सूत्रसंचालन यश मयेकर (प्रथम वर्ग, कला शाखा) याने केले. आभार वैष्णवी बंडागळे (प्रथम वर्ग, कला शाखा) हिने केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button