मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने २० जून रोजीच्या पत्रान्वये आगामी १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.
हा पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाच्या २४ जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये सुधारीत केलेला आहे. त्यानुसार दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक असे आहे : २५ जून ते १ ऑगस्ट २०२४ पुनरिक्षण पूर्व उपक्रम, २ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे, २ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दावे आणि आक्षेप दाखल करण्याचा कालावधी, विशेष मोहिमेची तारीख मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्राप्त होण्यावर, २६ ऑगस्टपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढणे, अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे, डाटाबेस अद्यावत करणे व पुरवणी यादी छपाई करणे, २७ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे.
या सुधारित कार्यक्रमानुसार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांना या कार्यालयामार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी मतदारयादीच्या वरील सुधारित पुनरिक्षण कार्यक्रमाची नोंद घ्यावी व या कार्यक्रमाअंतर्गत जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



