कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात येत्या स्वातंत्र्यदिनी उपोषण
संगमेश्वर स्थानकात ९ गाड्यांना थांबा मिळण्याच्या मागणीला प्रतिसाद न दिल्याने उचलणार पाऊल

नवी मुंबई : संगमेश्वर स्थानकात लांब पल्ल्याच्या ९ गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी गेले अनेक महिने होत आहे. या मागणीचे पत्र कोकण रेल्वे प्रशासनाला देऊनही त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने येत्या स्वातंत्र्य दिनी संगमेश्वर स्थानकात लक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर यां फेसबुक ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी दिली आहे.
संगमेश्वर हा तालुका भौगोलिक दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून सुमारे १९६ गावे असलेल्या यां तालुक्यातील जनतेसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वे मार्गांवरील महत्त्वाचे स्थानक आहे. या वर्षाला सर्वाधिक सुमारे ५ कोटी ३७ लाखांहून अधिक उत्पन्न देणाऱ्या या स्थानकात दररोज सुमारे १६०० प्रवासी ये-जा करतात. या प्रवाशांना खरे तर सद्यस्थितीत असणाऱ्या गाड्या कमी पडत आहेत.
याचाच विचार करून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपने संघर्ष करून गतवर्षी नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळवला. गुजरात, दिल्ली, तामिळनाडूकडे जाणाऱ्या गाड्यांपैकी एक तरी गाडी या स्थानकात थांबणे अपेक्षित आहे; मात्र अपेक्षित उत्पन्न देत असतानाही कोकण रेल्वे प्रशासन इथल्या प्रवाशांच्या मागण्याना योग्य प्रतिसाद देत नाहीत. या संबंधित ९ गाड्यांना थांबा मिळावा, अशा आशयचे मागणी पत्र रेल्वे प्रशासनाला देऊनही त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लक्षणिक उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे.
या संबंधीचे पत्र रेल्वे प्रशासनाला त्वरीत देण्यात येणार असून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती जिमन यांनी दिली.



