संगमेश्वर नवनिर्माण पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव उत्साहात

संगमेश्वर : येथील नवनिर्माण पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशीनिमित्त शाळेच्या जवळच आषाढी वारी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायातील वेशभूषा साकारून यात सहभागी झाले होते.
प्रारंभी वारी काढल्यानंतर या चिमुकल्यांनी शाळेच्या प्रांगणातच विठू माऊलीच्या नावाचा ठेका धरला आणि फुगड्या घालतानाच हरी नामाच्या गजराने शाळेचा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर सर्व मुलांनी सभागृहात वेगवेगळ्या गाण्यांवर, अभंगांवर नृत्याचे, भारुडाचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. रुदित्य भोसले, क्रिशा गोरड, अर्जुन कुष्ट्ये, भक्ती पटेल त्यांनी साकारलेली विठोबा आणि रखुमाईची वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
या कार्यक्रमाला नवनिर्माण शाळेचे मुख्याध्यापक किरण गुरव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख वैष्णवी महाडिक आणि आरती रणदिवे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.



