आर्टिकल

भ्रष्टाचाराने कोकण पोखरला… बोलतोय रिक्षावाला……

शहरातील रिक्षा चालक हा खऱ्या अर्थाने त्या शहराच्या सामाजिक अभिसरणाचा बोलता पट असतो याची प्रचिती नुकतीच आली. रत्नागिरी शहरात धुवांधार पाऊस कोसळत होता. समोरचा रस्ताही दिसत नव्हता. मारुती मंदिर ते जे. के. फाईल्स हे अंतर रिक्षाने जात असताना बाजूने सुसाट वेगाने जाणाऱ्या कारने रस्त्यावर खळाळून वाहणाऱ्या पाण्याचा इतका जोरदार फवारा उडविला की पार पॅन्ट शर्ट चिखलाने भिजून गेले. ‘अरे सावकाश बाबाऽऽ’ असे म्हणेपर्यंत काँक्रिटच्या रस्त्यावर जोरदार दडका बसला आणि जवळपास फुटभर रिक्षा उडाली. वरच्या छताला डोकेच आपटले. ‘अरे सावकाश चालव रिक्षा, आम्हाला मारून टाकशील’, सणकीतच मी रिक्षा चालकावर चिडलो. तर तो चक्क हसलाऽऽऽ.. मला अधिकच राग आला. ‘अरे तु हसतो आहेस?’

‘हो,साहेब मी रत्नागिरीकरांच्या सहनशक्तीवर हसतो आहे. गेली १५ वर्षे मी रिक्षा चालवितो आहे. पण या शहरातील रस्ते काही सुधारत नाहीत. आता काँक्रिट रस्ते आम्हाल वाटले वाऽऽऽऽ  गुळगुळीत तुळतुळीत रस्त्यावरून रिक्षा अशी सुसाट हाणू की वेळ ही कमी, गॅसही कमी आणि मेटेनन्सही कमी. काहीतरी शिल्लक राहिल पोरांची फी भरायला… पण नाही….यांना काही लाज लाजच नाही हो. रोज आमच्या जीवाशी खेळताना यांना शरम कशी वाटत नाही. रोज नवी आश्वासने देतात, आश्वासने ही यांची! काम ही यांची! ठेकेदार ही यांचेच. आम्ही कोट्यवधींचे आकडे ऐकतो; मात्र आमचे हाल आणि ग्राहकाच्या शिव्या काही थांबत नाहीत. आता तुम्हीच पहा ना! डोके आपटल्यावर थोडीच रस्ते आणि ते करणाऱ्याला बोलणार. मलाच शिवी घालणार!…. आता थोडे सज्जन पांढरपेशे दिसता म्हणून कॅालर पकडली नाहीत; परंतु एखादी स्त्री असेल आणि असा प्रसंग आला तर मारच खावा लागतो… काही वेळा तर या कॅान्ट्रॅक्टकरचेच लोक ठोकून काढतात.’

माझ्या डोक्यावर टेंबूक आले असताना आता मलाच हसू येऊ लागले. तो असेच खूप बोलत राहिला. येथील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा, त्यातील भ्रष्टाचारावर. त्याचे हे इतके जाहीर आरोप करणे आणि बोलणे मोठे धाडसाचे होते. त्याला आणखी खिजवावे म्हणून म्हणालो, ‘तू पण याच भ्रष्ट यंत्रणेचा एक भाग आहेसच ना! तू तरी काय करणार.’ यावर तो चक्क मागेच वळला आणि म्हणाला, ‘साहेब असे समजू नका! या संविधानाने आणि लोकशाहीने मला मताचा अधिकार दिला आहे आणि माझा अधिकार आता काही महिन्यांवरच आला आहे…’

ही प्रतिक्रिया फारच बोलकी होती. नुकताच दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने जी कोकणची वाताहात झाली आहे. त्याच्यामागे या रिक्षा चालकाला जाणवलेल्या वेदनांचाच उद्रेक निसर्गाने आपल्या रूपाने प्रकट केलेला दिसत आहे. कोकण रेल्वे ही कोकणचा अभिमान.. जागतिक दर्जाचे काम म्हणून नावलौकीक मिळविलेला प्रकल्प, चेअरमन श्रीधरन यांनी आपले सर्वस्व ओतून त्यांची क्वालिटी मेंटेन करतानाच सोबत प्रा. मधु दंडवते, जॅार्ज फर्नांडीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा प्रकल्प. ज्याच्या अभूतपूर्व गुणवत्तेमुळे थेट काश्मिर रेल्वे प्रकल्पातील आयफेल टॅावर पेक्षा उंच पुल बांधण्याचे काम या महामंडळाकडे एक आव्हान म्हणून आले आणि त्यांनी ते पूर्ण केले; मात्र प्रत्यक्षात कोकण रेल्वेचा विद्यमान व्यवस्थापन यंत्रणा निष्काळजी झाली आहे की काय? अशी अवस्था सद्यस्थितीत पहावयास मिळते.

पावसाळ्यापूर्वीचे नियोजन व्यवस्थापन आणि काळजी घेणारी महत्त्वाची कामे करण्यात यावेळी कोकण रेल्वेने ढिसाळपणा दाखविला की काय? असा प्रश्न ह्यावर्षी उपस्थित केला जात आहे. गोवा-पेडणे येथील बोगदा पावसाळ्यातील पहिल्याच पावसात पाण्याने भरून गेला. तेथे चिखल, मातीचा खच वाढला, बोगद्यात पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आणि त्याचे छोट्या ओहळात रूपांतर झाले. यामुळे कोकण रेल्वे मार्ग जवळपास दोन दिवस बंद राहिला. ३० पेक्षा अधिक ट्रेन र­द्द कराव्या लागल्या. लोकांचे प्रचंड हाल झाले. ३०-३० तास लोक अडकून बसले. अनेकांना पुढील कनेक्टिंग ट्रेन, विमान तिकीटे रद्द करावी लागली. यावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचे जनजीवन कोसळून पडले आणि प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. याची नुकसान भरपाई कोण करणार? पाठोपाठ काल दिवाण खवटी आणि व्हीनेर येथे दरड कोसळली आणि पूर्ण रेल्वे मार्ग पुन्हा ठप्प झाला.

या दरडी कोसळण्याचा अनुभव कोकण रेल्वेला नवा नाही. प्रत्यक्ष काम चालू असताना मोठ मोठ्या दरडी कोसळत असतानाही कोकण रेल्वे इतका काळ ठप्प राहिली नाही इतकी तिची सध्य अवस्था आहे. हे निव्वळ त्यांच्या व्यवस्थापनातील बेदरकारपणा आणि त्यातील होणाऱ्या कामातील भ्रष्टाचार असू शकतो. याची चौकशी वरिष्ठ पातळीवर होणे गरजेचे आहे. कोकणातील लोकांना गृहीत धरून चालण्याची जी सवय गेल्या अर्धशतकातील आहे तिला धक्का देण्याची गरज कोकणी मनात आता उसळी मारून येत आहे.

ह्या पेक्षा भीषण अवस्था मुंबई-गोवा कोकण महामार्गाची आहे. तो तर कोकणच्या क्रुर चेष्टेचा विषय झाला आहे. मागील आठवड्याच्या पावसात ओरस जवळील संपूर्ण चौपदरी महामार्गच पाण्याखाली गेला होता. पूर्ण वाहतूकच ओरस राजधानीच्या आतील मार्गाने वळवावी लागली. राजापूर-डोंगर या गावाजवळ तर महामार्गावर प्रचंड असा धबधबाच कोसळू लागला. शेजारील ॲबेटमेंट एखाद्या लाकडाच्या तुकड्यासारखी कोसळून खाली पडली. चिपळूण येथे अशीच दरड कोसळली या माहामार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या.

कोकणच्या पावसाचा अंदाज यांना आहे. मातीचा गुण माहित आहे आणि त्यासाठी १४ वर्षे या महामार्गाचे काम सुरू आहे; मात्र अत्यंत सुमार दर्जाचे काम आणि त्यातील राजकीय वाटेकऱ्यांचा प्रचंड भ्रष्टाचार यामुळे हे काम रेंगालले आहे, असे एकदा गडकरीच म्हणाले होते. त्यांचा रोख नक्की कोणावर होता कळले नाही; मात्र तोच धागा त्सुमार दर्जाचे होत असल्याचे भीषण वास्तव पावसात समोर आणत आहे आणि राजकारणी मात्र प्रचंड गब्बर होत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याला तर कोणी वालीच नाही. मध्यंतरी पदवीधर मतदारसंघात कोकणातून रत्नागिरीला संधी मिळाली. रत्नागिरी जिल्ह्याच्या वाटणीला हे प्रथमच संधी होती. संपूर्ण रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा केवढी आशा बाळगून होता किमान विधान परिषदेच्या पटलावर आमचा आवाज मांडला जाईल; परंतु तेथेही सगळे एकतर्फीच. लोक काही भलतेच बोलू लागले. तेथेही निराशा! ही भ्रष्टाचाराची कीड संपूर्ण कोकणला पोखरत आहे. त्याचे पडसाद त्या रिक्षावाल्याच्या कडवट, तीव्र शब्दांत शब्दात उमटत होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button