मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आवाहन

रत्नागिरी : राज्यामध्ये युवक वर्ग शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायाच्या शोधात बाहेर पडत आहेत. बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ९ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जाणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे रुपये ६ हजार रुपये, ८ हजार रुपये, १० हजार असे विद्यावेतन दिले जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी बैठक घेऊन या योजनेचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने नियोजन करून जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या.
जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापना, सेवा क्षेत्र तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळे यांचे अधिकारी, पदाधिकारी यांनी रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून देऊन त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी या योजनेचा १०० टक्के लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहून जिल्ह्य़ात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत तसेच यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपारी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.



