मुख्य बातमी

रत्नागिरीत जिल्हास्तरीय कार्यशाळा व खरेदीदार-विक्रेता संमेलन उत्साहात 

रत्नागिरी : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्हा अंमलबजावणी कक्ष रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या वतीने २७ डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा परिषद येथील कै. शामराव पेजे सभागृहात जिल्हास्तरीय कार्यशाळा व खरेदीदार-विक्रेता संमेलनाचे (Buyer-Seller Meet) आयोजन करण्यात आले होते.

यात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत १२ खरेदीदार (Buyer), ४० प्रक्रियाधारक (Seller) व स्मार्ट प्रकल्पातंर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ मान्यता प्राप्त समुदाय आधारित संस्थानी सहभाग नोंदवला. योजनेंतर्गत मंजूर झालेल्या प्रक्रियाधारकांनी उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉल लावण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन कोकण विभाग ठाणेचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्या हस्ते करण्यात आले. स्मार्ट प्रकल्प कोकण विभाग ठाणेचे विभागीय नोडल अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी स्मार्ट प्रकल्पाचे सादरीकरण केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, (रत्नागिरी) शिवकुमार सदाफुले यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना व स्मार्ट प्रकल्पबाबत प्रास्ताविक केले. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी लक्ष्मण खुरकुटे यांनी दोन्ही जिल्ह्यातील शेतमाल पिके खरेदी-विक्री व्यवसायास असणारा वाव याबाबत माहिती दिली. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थांचा तसेच उपस्थित असलेल्या खरेदीदारांचा परिचय करून दिला.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना संदर्भात PMFMEचे मास्टर ट्रेनर लिनेश निकम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी अंवरीश मिस्त्री, जिल्हा अग्रणी बँक बँक ऑफ इंडिया रत्नागिरीचे प्रतिनिधी संकेत लेंडे व रोहित सुर्वे यांनी योजनेसाठी लागणाऱ्या बँकेच्या आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी रत्नागिरी फिरोज शेख यांनी एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्बर फंड व PMFME योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली.

या संमेलनात काजू, आंबा, फणस आदी फळपिकांचे खरेदीदार व विक्रेत्यांचे सर्वांसमक्ष एकूण सात सामंजस्य करार करण्यात आले. या संमेलनास रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी फलोत्पादन प्रमोद पाटील, क्षेत्रीय अधिकारी PMFME अक्षय सनगर व पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर काशीद यांनी केले, तर पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ अमीर डांगे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रत्नागिरी व प्रकल्प अंमलबजावणी कक्ष रत्नागिरी व सिंधुदुर्ग कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात एकूण ११५ लोकांनी सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button