आमदार भास्कर जाधव आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
गुहागर विधानसभा मतदारसंघातून सुमारे वीस हजार कार्यकर्ते अर्ज भरण्यासाठी येणार - तालुकाप्रमुख सचिन बाईत

गुहागर : आमदार भास्कर जाधव आज (२४ ऑक्टोबर) हातामध्ये मशाल धरून तुतारीचा शंकनाथ करत सुमारे वीस हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज गुहागर तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करणार आहेत, अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी दिली.
सकाळी १० वाजता शृंगारतळी येथे शृंगारतळी शहर व आजूबाजूच्या परिसरातील कार्यकर्त्यांकडून आमदार भास्कर जाधव यांचे शृंगारतळी बाजारपेठेमध्ये जोरदार स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ती मिरवणूक गुहागर शिवाजी चौक येथे येईल. शिवाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही मिरवणूक तहसील कार्यालयाच्या दिशेने निघणार आहे. आमदार जाधव यांचे कार्यालय असणाऱ्या हॉटेल प्रेस्टीजच्या पटांगणावरती एक कॉर्नर सभा होईल. आमदार भास्कर जाधव उमेदवारी अर्ज दाखल करण्या आधी आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर आमदार भास्कर जाधव हे प्रमुख काही नेत्यांबरोबर आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालय मध्ये जातील, असेही बाईत त्यांनी सांगितले.
प्रत्येक गटातून दोन हजार कार्यकर्ते हे आमदार भास्कर जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. गुहागर तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट, गुहागर शहर असगोली असे विभाग येतात. त्यानंतर चिपळूण तालुक्यातील साडेतीन जिल्हा परिषद गटातूनही प्रत्येकी दोन हजार कार्यकर्ते येणार असल्याचे बाईत यांनी सांगितले.
एक शिस्तबद्ध अशी ही मिरवणूक निघणार असून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सामील व्हावे, असे आवाहनही बाईत त्यांनी केले आहे.
आम्हाला ही लढाई वाटत नाही. विजय हा आमचा एकतर्फी होणार आहे. भास्कर जाधव यांचा विजय हा ६० हजार एवढ्या मोठ्या मताधिक्याने होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. महाविकास आघाडी असल्यामुळे महाविकास आघाडीसोबत असलेल्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊनच प्रचार यंत्रणा राबवणार असल्याचे बाईत यांनी शेवटी सांगितले. भास्कर जाधव हे शिवसेनेचे नेते असल्यामुळे आम्ही त्यांना जास्त वेळ गुहगर विधानसभेमध्ये अडकवून ठेवणार नाही त्यांना प्रचारासाठी विदर्भ आणि मराठवाड्यात सुद्धा जाण्याची मुभा आम्ही कार्यकर्त्यांनी दिली असून कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयाची जबाबदारी घेतली असल्याचे म्हणाले. अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषद गटात आमदार जाधव यांची सभा होणार आहे. त्यानंतर एखादी मोठी सभा ही होईल.



