Uncategorized

जिल्ह्यात डेंग्यू प्रतिबंधासाठी आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण मोहीम

७ हजार ५०० घरांची तपासणी; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्ह्यात डेंग्यू प्रतिबंधासाठी आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत डेंग्यू रुग्णांची संख्या १५५ वर पोचली आहे. सर्वेक्षणात ७ हजार ५०० घरांची तपासणी करण्यात आली असून १ हजार ५५३ तापाचे रुग्ण आढळले. त्यांची तपासणी करून घरीच उपचार करण्यात आले.

जुलै महिना हा डेंग्यू प्रतिरोधक महिना म्हणून राबविला जात असल्यामुळे १ जुलैपासून सर्व घरांना भेटी देऊन डास अळी असलेली भांडी तपासणे, त्यामध्ये टेमिफोसचे द्रावण टाकून ती भांडी रिकामी करणे, तसेच ताप रुग्णाचा रक्तनमुना घेऊन गृहीतोपचार करणे, पाणी साचलेली डबकी वाहते करणे किंवा त्यात गप्पी मासे सोडणे, डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, डेंग्यू आजाराबद्दल आरोग्य शिक्षण देणे ही सर्व कामे या मोहिमेत केली जात आहेत.

दि. १ ते ८ जुलै या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणात ७ हजार ५९२ घरांमध्ये २६ हजार ८६८ पाणी साठे असलेली भांडी तपासण्यात आली. त्यापैकी ४७६ घरांमध्ये पाणी असलेल्या १ हजार ५९ भांड्यामध्ये डासांची अळी आढळली. या परिसरात ९ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. आतापर्यंत ४ हजार ९६ घरांमध्ये धूर फवारणी केली. तसेच १ हजार ५५३ ताप रुग्णांची रक्तनमुना तपासणी करून त्यांच्यावर गृहीतोपचार केले गेले. ही मोहीम ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी सांगितले.

डेंग्यू आजार पसरवण्यास एडिस इजिप्त हा डास कारणीभूत आहे. डेंग्यु झालेल्या व्यक्तीला डास चावला तर रोग्याच्या रक्तातील डेंग्यू विषाणू त्या डासाच्या शरीरात शिरतात आणि डेंग्युचा प्रादूर्भाव होतो. डेंग्यू रोगाचा प्रसार थांबवयाचा असल्यास एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून मोहिम राबवण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून आरोग्य विभागाकडून सुचवण्यात आलेल्या उपाययोजना राबवाव्यात आणि डेंग्युवर नियंत्रण आणण्यात मदत करावे, असे आवाहन मुख्य अधिकारी कार्यकारी कीर्ती कीरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

डेंग्यूची लक्षणे

डेंग्यू झालेल्यांना तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी व सांधेदुखी, थंडी वाजून ताप येणे, उलट्या होणे, डोळयांच्या आतील बाजूस दुखणे अशी लक्षणे दिसतात. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. अंगावर पुरळ, अशक्तपणा, भुक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, घाम येऊन अंग गार पडणे, त्वचेखाली, नाकातून रक्तस्त्राव होणे व रक्ताची उलटी होणे. रक्तमिश्रित किंवा काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे दिसतात. काहीवेळी रक्तजलाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण अत्यवस्थ होतो.

जनतेने घ्यावयाची काळजी 

– पाणी साठविण्याच्या भांड्यातील पाणी रिकामी करून घासुन कोरडी करावी.

– एक दिवस कोरडी ठेऊन पाणी भरावे.

– मोठ्या टाक्या ज्या रिकाम्या करता येणे शक्य नाहीत त्यांना घट्ट झाकण बसवा.

– घरातील फ्लॉवर पॉट, कुलर व फ्रिजचा खालच्या ट्रे मधील पाणी काढून स्वच्छ करा.

– भंगार वस्तू, प्लास्टिक बाटल्या, नारळाच्या करवंट्या, खराब टायर्स यांची विल्हेवाट लावा.

– परिसरातील पाण्याची डबकी वाहती करा.

– जी डबकी बुजवता येणार नाही त्यात अळीनाशक औषध टाका.

– शौचालय आणि ड्रेनेजच्या व्हेंन्ट पाईपला जाळ्या बसवा.

– झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.

– ताप आल्यास शासकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button