जॉली स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रत्नागिरी जिल्हा मानांकनपद कॅरम स्पर्धेचे आयोजन

दापोली : येथील जॉली स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रत्नागिरी जिल्हा मानांकनपद कॅरम स्पर्धा २०२४-२५ आयोजित करण्यात आली आहे. जॉली स्पोर्ट्स क्लब, एस टी डेपो दापोलीच्या बाजूला, दापोली येथे जॉली स्पोर्ट्स, दापोली येथे होईल. ही स्पर्धा २८ व २९ डिसेंबर या कालावधीत पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी, कुमार गट, कुमारी गट किशोर गट आणि किशोरी गट अशा सात गटांत खेळवली जाणार आहे.
या वर्षातील ही चौथी स्पर्धा आहे. जे खेळाडू यावर्षी कोणतीही स्पर्धा खेळलेली नाही त्या खेळाडूंनी २०२४-२५ या वर्षाची रजिस्टेशन फी ५० रुपये जिल्हा असोसिएशनकडे जमा करायची आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी पुरुष व महिला गटासाठी १५० रुपये, दुहेरीसाठी २०० रुपये व लहान गटासाठी १०० रुपये याप्रमाणे असेल. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवशक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करणात येईल.
सर्व स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आपल्या तालुका प्रतिनिधीकडे स्पर्धा शुल्कासहित द्यावात. स्पर्धेत सामना खेळण्यासाठी खेळाडूने पांढरा रंगाचा टीशर्ट किंवा शर्ट परिधान करणे आवश्यक आहे. या स्पर्धेपासून पुरुष दुहेरी गटाचे सामने चार बोर्डाचे तीन सेट अशा पद्धतीनेच खेळवण्यात येणार आहेत.
या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून साईप्रकाश कानिटकर व कैलास देवळेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घेणाचे आवाहन जॉली स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अरुण मकरंद गांधी, सचिव श्रीराम माजलेकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, उपाध्यक्ष सुरेंद्र देसाई, सल्लागार सुचय अण्णा रेडीज आणि सचिव मिलिंद साप्ते यांनी केले आहे.



