जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत अतिसार थांबवा विशेष अभियानतून जनजागृती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिसाराचे (डायरिया) प्रमाण वाढू नये म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी १ जुलैपासून ३१ ऑगस्टपर्यंत अतिसार थांबवा हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पाणी व स्वच्छता क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी दिली.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, अतिसार थांबवा अभियानात जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्यकेंद्र व सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये दूषित आढळलेले पाणीनमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर या अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येऊन ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणा, सर्व विभाग या अभियानात सहभाग घेऊन नियोजन करण्याबाबत सूचित केले आहे.
गावपातळीवर पाण्याचे व्यवस्थापन व स्वच्छता, पाणीगळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता उपक्रम राबवणे, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता व पाणी तपासणी करणे, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गावे हागणदारीमुक्त अधिक करणे, छतावरील पाऊस पाणी संकलन राबवणे, पाणीस्वच्छतेचे महत्त्व आणि त्याचा गावपातळीवर होणारा परिणाम या विषयी जनजागृतीची मोहीम गावस्तरावर राबवण्यात येणार आहे, असे पुजार यांनी सांगितले.



