मुख्य बातमीराजकीय

लोकसभेत राहुल गांधींचं वादळ सुटलं?

-बी.रवींद्र

काल (१ जुलै) लोकसभेच्या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील “धन्यवाद” प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे सडेतोड भाषण सत्ता पक्षाची भंबेरी उडवून देशाला नवा आशेचा किरण दिला. शांत, संयमी, आक्रमक, अभ्यासू, विवेकशील, हजरजबाबी अश्या अनेक कोंदिनीयुक्त प्रभावी भाषणाची छाप देशावर पडली.

राहुल गांधी यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना निर्विवाद सूचना देताना सभापती महोदयांनी पक्षपात न करता पदाचा सन्मान राखून आपले वर्तन ठेवावे, अशी सूचना करीत यासंदर्भात उदाहरण देताना राहुल गांधींनी ज्यादिवशी लोकसभा अध्यक्षाची निवड झाली त्याचदिवशी ओम बिर्ला यांना अध्यक्षांच्या आसनावर विराजमान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे दोघेही बिर्लांच्या सोबत गेले. अध्यक्षपदाच्या आसनावर बसण्यापूर्वी ओम बिर्लांनी माननीय पंतप्रधानांशी हस्तांदोलन करतांना वाकून-झुकून हस्तांदोलन केले. तर विरोधी पक्षनेता राहुल गांधीशी हस्तांदोलन करताना न वाकता ताठ उभे राहून हस्तांदोलन केले. लोकसभेच्या अध्यक्षाने अशाप्रकारे झुकू नये हे राहुलनी सांगितले आणि सारा सभागृह अवाक झाला.

यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी अध्यक्षांवर विरोधी पक्षनेता पक्षपातीपणाचा आरोप करत आहेत म्हणून आक्षेप नोंदवला; मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वतःच्या कृतीवर स्पष्टीकरण देताना, “मी ज्या कुटुंबातून, मी ज्या संस्कृतीतून येतो त्यामध्ये माझ्यापेक्षा जेष्ठांचा आदर करताना वाकून हस्तांदोलन व पदस्पर्श करून अभिवादन करावे असे शिकवले आहे. मी त्याच संस्काराचे वहन केले.” असे स्पष्टीकरण दिले. लागलीच हजरजबाबी राहुलनी तात्काळ उठून प्रतिक्रिया दिली की, “मी आपल्या मताचा आदरपूर्वक स्वीकार करतो. आपल्यावरील संस्कारानुसार आपण वर्तन केले त्याबद्दल आपला आदरच आहे; मात्र संसदीय लोकशाहीत लोकसभेच्या सभागृहात व्यक्ती मोठी नसून पद मोठे आहे. त्यामुळे लोकसभेत “लोकसभा अध्यक्ष” ओम बिर्ला सोडून इतर कोणतेही पद घटनात्मक दृष्टीने मोठे नाही. याचे भान विरोधी पक्षनेता म्हणून मी व माझे सहकारी लोकसभा सदस्य राखतील. इतरांनीही राखले पाहिजे, हे ऐकून सभागृह शांतच झाला.

विरोधी पक्ष नेते राहुल गांधीचा असा आक्रमक आणि हजरजबाबी अवतार पाहून लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाच्या मंत्रिमंडळासह खासदारांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. अधिवेशनातील आजच्या दिवसाने अजूनही भारतीय लोकशाही आणि काँग्रेस नेतृत्व जिवंत आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

राहुल गांधींनी चौफेर फटकेबाजी केली. कळीच्या मुद्यावर बोलून देशाचे लक्ष वेधले. भाजप, आरआरएस म्हणजे हिंदू नाही… देशात आपणच नफरत आणि भीती उत्पन्न केली… असे ठणकावून सांगून आग्निवीर, नीट, किसान, महागाई, रोजगार, मणिपूर, संविधान अनेक प्रश्नांवर सडेतोड भाष्य केले. त्यावर प्रतिक्रिया द्यायला देशाच्या पंतप्रधानांना उभे रहावे लागले. अमित शहा, शिवराज चव्हाण, रिजिझु सहित अनेकांना हस्तक्षेप करावा लागला हेच राहुल गांधींच्या भाषणाचे यश आहे. ज्यांच्यावर करोडो रुपये खर्च करून गोदी व सोशल मीडिया, पक्ष, भक्त यांच्या संगनमताने बेछूट, खोटे आरोप दिशाभूल करणारे खोटे पोस्ट, एडिट व्हिडीओ अश्या अनेक साधनांचा वापर करीत राहुलला झाकण्याचा प्रयत्न केला; मात्र हाच राहुल आता भारतजोडो- न्याय यात्रेनंतर भारतीय राजकारणाचा नवा सूर्य म्हणून उगवला आहे. त्याला आता कधीच झाकता येणार नाही. भारतीय संविधान वाचविला गेले आहे. अंधभक्तांच्या डोळ्यांवरील कचकून बांधलेल्या पट्ट्या हळूहळू सैल होताना दिसत आहे, हेच बदलत्या समृद्ध भारताचे चित्र आहे येवढे मात्र निश्चित!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button