राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्र्यांना पाठवले बदाम
रत्नागिरी जिल्हा व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी

रत्नागिरी : उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीररित्या केलेल्या घोषणेची आठवण व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्हा व शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत दादा यांना पत्र तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम पाठविले आहेत.
दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या जून महिन्यापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही, अशी जाहीर घोषणा केली; परंतु शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जून महिना अर्धा होत आला तरी अद्यापही घोषणा केल्याप्रमाणे विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाबद्दलच्या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही किंवा अंमलबजावणी केलेली नाही.
या घोषणेची अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे रत्नागिरी जिल्हा व शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांना पडलेला विसर म्हणून असंख्य पत्र तसेच स्मरणशक्ती वाढवून विसर पडलेल्या घोषणेची आठवण व्हावी म्हणून बदाम पाठवले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सौ. शमीम नाईक, शहराध्यक्ष सौ. पल्लवी सावंत, शहर उपाध्यक्ष सौ. धूर्धना पटकुरे या उपस्थित होत्या. याचे सर्व नियोजन शहर कार्याध्यक्ष सौ. मुनवर-सुलताना फरान मुल्ला यांनी केले.



