माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक रत्नागिरीत व्हावे
रत्नागिरी भाजपाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी केली मागणी

रत्नागिरी : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जनशताब्दी वर्ष सुरू होत असून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंती दिवस २५ डिसेंबर रोजी संपूर्ण देशामध्ये सुशासन दिवस म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्त भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक रत्नागिरीत व्हावे अशी मागणी रत्नागिरी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक रत्नागिरीत असेल तर ते सर्वांसाठी अभिमानाचे असणार आहे. त्यांचे स्मारक होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न व्हावे किंवा एखाद्या संस्थेला किंवा भारतीय जनता पार्टीला जागा उपलब्ध करून दिल्यास आम्ही यासाठी प्रयत्न करू, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

आम्ही केलेल्या मागणीचा विचार व्हावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, शहर अध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका अध्यक्ष दादा दळी, अशोक वाडेकर नंदकिशोर चव्हाण, दादा ढेकणे, संदीप सुर्वे, मंदार खंडकर, तुषार देसाई, बावा नाचणकर, ययाती शिवलकर, निलेश आखाडे आदी भाजप कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना भेटून केली आहे.



