२४ ते ३० जून दरम्यान गोव्यात ‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी जिल्ह्यातून ३० संघटनांचे ३८ प्रतिनिधी सहभागी होणार
रत्नागिरी : हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही बारावे ‘अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन’ अर्थात ‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे होणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी यांनी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
काल (२० जून) झालेल्या या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सुरेश शिंदे, महाराष्ट्र मंदिर महासंघ दक्षिण रत्नागिरीचे समन्वयक सुनील सहस्त्रबुद्धे, रत्नागिरी येथील हिंदुत्वनिष्ठ राकेश नलावडे हेही उपस्थित होते.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे संजय जोशी म्हणाले की, यंदाच्या अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राशी संबंधित विविध विषयांवर तज्ञ मान्यवरांचे परिसंवाद, तसेच प्रत्यक्ष समान कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी गटचर्चा असतील. ‘सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा’, ‘धर्म आणि राष्ट्रविरोधी नॅरेटीव्हला प्रत्युत्तर’, ‘हिंदु समाजाच्या रक्षणाचे उपाय’, ‘हिंदु राष्ट्रासाठी संवैधानिक प्रयत्न’, ‘मंदिर संस्कृतीच्या रक्षणाचे उपाय’, ‘वैश्विक स्तरावर हिंदुत्वाचे रक्षण’, ‘देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्या हलाल अर्थव्यवस्थेवर उपाय’, ‘लँड जिहाद’, ‘काशी-मथुरा मुक्ती’, ‘गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे’ यांसारख्या विविध विषयांसोबतच हिंदू राष्ट्राच्या पायाभरणीसाठी आवश्यक विविध विषयांवर या महोत्सवामध्ये विचारमंथन होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भगवान श्री परशुराम देवस्थान चे विश्वस्थ आणि श्री सतनाम वारकरी संप्रदायाचे प्रमुख संयोजक अभय सहस्त्रबुद्धे, रत्नागिरी जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष लक्ष्मण गुरव, शिवप्रतिष्ठान रत्नागिरी जिल्हाप्रमुख गणेश गायकवाड, उद्योजक दीपक देवल यांच्यासह जिल्ह्यातील ३८ हिंदुत्वनिष्ठ महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.”
अधिवेशनाविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. शिंदे म्हणाले की, “या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, घाना, नेपाल आणि बांग्लादेश या देशांतून प्रतिनिधी येणार आहेत. या देशांसह भारतातील २६ राज्यांतील १००० हून अधिक हिंदू संघटनांच्या २००० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने इंदूर येथील महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगड येथील श्रीरामबालकदास महात्यागी महाराज, छत्तीसगढ येथील ‘शदाणी दरबार’चे प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज आदी संतांची उपस्थितीही या अधिवेशनाला लाभणार आहे.”
“याशिवाय प्रामुख्याने श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी, तसेच काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, ‘हिंदु इकोसिस्टिम’चे संस्थापक कपिल मिश्रा, भारताचे माजी माहिती आयुक्त तथा ‘सेव कल्चर सेव भारत’चे संस्थापक उदय माहूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी सामाजिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत,” असे ते म्हणाले.
या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदू जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या‘HinduJagruti’ या यु-ट्यूब चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या फेसबुकद्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.



