रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाज सेवा संस्थेतर्फे गुणवंतांचा सत्कार

रत्नागिरी : जिल्हा वैश्यवाणी समाज सेवा संस्थेतर्फे वैश्यवाणी समाजातील संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, राजापूर, देवरुख या परिसरातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी दहावी किंवा बारावीच्या बोर्ड परीक्षेत मिळालेले गुणपत्रकाची प्रत, आधार कार्डची प्रत तसेच पालकांचा फोन नंबर, संपर्क नंबर संस्थेकडे पाठवावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास शेट्ये यांनी केले आहे.
यावर्षी प्रथमच रत्नागिरी जिल्हा वैश्यवाणी समाज सेवा संस्थेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील दहावी बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव कार्यक्रम खेड येथे १४ जूनला झाला. आता पुढील टप्प्यात संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, राजापूर आणि देवरुख या परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी समाजबांधवांनी आपले पाल्य तसेच आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजबांधवांच्या गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती संस्थेकडे पाठवावी. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्ड परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे गौरविण्यात येणार आहे.
याबाबत आवश्यक ती माहिती आपल्या तालुक्याच्या समाज संस्थेचे अध्यक्ष, सेक्रेटरी किंवा पदाधिकारी यांचेमार्फत जिल्हा संस्थेकडे पोचेल अशी पाठवावी. याबाबतचे अधिकृत माहिती २० जूनपर्यंत संस्थेकडे येणे आवश्यक असल्याचे डॉ. शेट्ये यांनी सांगितले.
संस्थेतर्फे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचा संस्थेचा मनोदय असून, या गुणवंत विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनीची यासाठी निवड केली जाणार आहे. त्यांचा संपूर्ण वर्षाचा शैक्षणिक खर्च संस्थेतर्फे केला जाणार असल्याची माहिती डॉ. शेट्ये यांनी दिली. आपला प्रस्ताव २० जूनपर्यंत संस्थेकडे जमा होईल असा पाठवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.



