‘अनबॉक्स’च्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

रत्नागिरी : ‘अनबॉक्स – युअर डिझायर’च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त काल (९ जून) घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जवळपास ५२ जणांनी रक्तदान केले. या दात्यांना ‘अनबॉक्स’तर्फे गिफ्ट कुपन देण्यात आली. शहरातील तारांगणासमोरील मराठा मंडळ हॉलमध्ये घेण्यात आलेल्या या शिबिराला धर्मादाय संस्थेचेही सहकार्य लाभले.

या शिबिरात ‘अनबॉक्स’ कार्यालातील सहकारी आणि डिलिव्हरी टीम, धर्मादाय संस्थेतील सहकाऱ्यांबरोबरच अनेकांनी रक्तदान केले. येथील तरुण उद्योजक गौरांग आगाशे याने चार वर्षांपूर्वी ‘अनबॉक्स – युअर डिझायर’ हे फूड डिलिव्हरी ॲप सुरू केले. गौरांग हे ‘अनबॉक्स’च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जोपासण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर साठणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून ते रिसायकल प्लांटला देण्याचा उपक्रमही ‘अनबॉक्स’तर्फे गेली पाच महिने राबविला जात आहे. त्यालाही रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनीही या शिबिराला भेट देऊन ‘अनबॉक्स’ने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. श्री. आगाशे यांनी शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत यापुढेही ‘अनबॉक्स’तर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातील, असे सांगितले.



