डिंगणी येथे सापडलेल्या मृत बिबट्याच्या बछड्याचा वनविभागामार्फत तपास सुरू

रत्नागिरी : डिंगणी चाळकेवाडी (ता. संगमेश्वर) येथे काल (१७ मे) सकाळी ८ वाजता रस्त्यालगत बिबट्याचा बछडा हा मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती डिंगणीचे पोलीस पाटील यांनी दूरध्वनीद्वारे वनविभागास दिली होती. या माहितीच्या अनुषंगाने संगमेश्वर वनपालांनी रेस्क्यू टीमसह घटनास्थाळी जाऊन पाहणी केली असून, याचा तपास सुरू केला आहे.
वनक्षेत्रपालांनी पंचासमवेत घटनास्थळी जावून पंचनामा केला. बिबट्या हा अंदाजे तीन ते चार महिने वयाचा मादी प्रजातीचा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मानेवर दाताच्या खोल खुणा दिसून आल्या व त्या जखमेतून रक्तमिश्रीत पाणी वहात असल्याचेदेखील दिसून आले. पायाच्या वरील बाजूस जखम असल्याचे आढळले. मृत बछड्याच्या शरीराची मापे घेवून शव ताब्यात घेण्यात आले. पुढे देवरुख येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याचा मृत्यू हा वन्यप्राण्याच्या हल्यात जखमी होवून झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे.
वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांच्यामार्फत पंचासमक्ष मृत बिबट्यास त्याच ठिकाणी लाकडाची चिता रचून दहन करून नष्ट करण्यात आले. बिबट्याच्या मृत्यूबाबतचा अधिक तपास विभागीय वन अधिकारी (चिपळूण) गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) अ.का. वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार व त्यांचे अधिनस्त वनपाल संगमेश्वर, वनरक्षक, कडुकर व वनरक्षक कराडे हे करत आहेत.
मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्यासाठी वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक वनसंरक्षक श्री. बोराटे यांनी केले आहे.



