किरण सामंत पुन्हा सक्रिय

रत्नागिरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना नेते किरण सामंत उर्फ भैय्याशेठ पुन्हा सक्रिय झाले आहेत. आज (१८ मे) ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर असून, सायंकाळी ४ वाजता ते कणकवलीतील शिवसेना कार्यालयात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीनही विधानसभा मतदारसंघातील शाखाप्रमुख, बूथप्रमुख, विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्यासोबत पक्ष बांधणीसंदर्भात चर्चा करणार आहेत.
या दौऱ्यात ते आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, गावनिहाय दौऱ्याचे नियोजन केले जाणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या सर्व विधानसभा प्रमुख, जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, तसेच सर्व उपजिल्हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख, तालुका समन्वयक, जिल्हा संघटक, या सर्व पुरूष व महिला पदाधिकारी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकासंदर्भात या दौऱ्यामध्ये चर्चा आणि नियोजन केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीतील घडामोडीनंतर किरण सामंत यांचा हा पहिलाच जाहीर दौरा आहे. त्यामुळे सर्वांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.



