‘नवनिर्माण हाय’मध्ये उन्हाळी शिबीर उत्साहात
आठवडाभर विविध उपक्रमांची रेलचेल; पालकांचाही सहभाग
रत्नागिरी : येथील नवनिर्माण हाय इंग्लिश मिडीयम शाळेत २३ ते ३० एप्रिल या कालावधीत पहिली ते बारावीच्या (सीबीएससी) विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन केले होते.



२३ एप्रिलला ‘इंग्लिश लँग्वेज डे’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये यांनी विल्यम शेक्सपिअर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन हा दिवस का साजरा केला जातो हे सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम केले. २५ एप्रिलला चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या माता पालकांसाठी परफेक्ट मॅचिंग, फनी गेम्स, बॉल इन बकेट, रिलेटेड वर्ड्स, माइंड रिडिंग अशा विविध स्पर्धा घेतल्या गेल्या. यात परफेक्ट मॅचिंग स्पर्धेत मुलांमध्ये कबीर कुंभवडेकर, अर्णव साळुंखे यांनी तर मुलींमध्ये आभा माणगावकर, स्पृहा काळे यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावले. त्यानंतर फनी गेम्स घेण्यात आले. बॉल इन बकेट स्पर्धेत अक्षरा साळुंखे, प्रिया मनोरकर, शबाना सय्यद यांनी , रिलेटेड वर्ड्समध्ये अर्णव साळुंखे, अरजानअली सय्यद, अफान खान, तर माइंड रिडिंग स्पर्धेत संयुक्त भुजबळ, स्पृहा काळे, सार्थक चव्हाण यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. या सर्व स्पर्धांचे परीक्षण शिक्षिका गीतांजली सावंत, नाझिया मजगावकर, शिक्षक निखील कांबळे, गौरव गोसावी यांनी केले. शिक्षिका सायली सागवेकर, वैष्णवी चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तब्बसुम खान यांनी आभार मानले.

२६ आणि २७ एप्रिलला ‘क्रिएटिव्ह अचिव्हर्स वर्कशॉप’ घेण्यात आले. यात लेखक, पत्रकार, छायाचित्रकार, दिग्दर्शक, थेट प्रक्षेपण विशेषज्ञ गिरीश केमकर (पुणे) आणि लेखक पत्रकार अमृता धायरीकर (पुणे) यांनी आठवी आणि नववीच्या विठ्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांचे ८ ग्रुप बनवून त्यांना वेगवेगळे टास्क देण्यात आले. यात स्वतःचे ध्येय, ग्रुप तयार करून त्यातून नेतृत्वाची निवड, ग्रुपचे नाव ठरवणे, मेडिटेशन, ग्रुपमधील एका विद्यार्थ्यला पुतळा बनवून त्याला दागिने परिधान करणे आदी वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आला.

२९ एप्रिलला दहावीच्या विद्यार्थ्यांना वाळूशिल्प कसे साकारावे या विषयावर सिंधुदुर्ग येथील वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी मार्गदर्शन केले. भाट्ये समुद्रकिनारी वाळूशिल्पाचे प्रात्यक्षिक दाखविल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने अनेक शिल्पे साकारली. याच दिवशी शाळेत पहिली, दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘गम्मत जम्मत’ हा उपक्रम राबविण्यात आला. यात विद्यार्थ्यांसाठी आनंदाचे झाड, गाणी-गोष्टी, शेअरिंग, कलरिंग, थम्ब प्रिंटींग अशा अनेक गोष्टी घेण्यात आल्या.

३० एप्रिलला नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्विझ कॉन्टेस्ट घेण्यात आले. यात अंबर हाउस, रुबी हाउस, एमराल्ड हाउस आणि सफायर हाउस यांच्यात सामान्य ज्ञानावर आधारित स्पर्धा झाली. ही स्पर्धा रुबी हाउसने जिंकली. याच दिवशी सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या सभागृहातील भिंतींवर वारली पेंटिंग केले.
आठवडाभर सुरु असलेल्या उपक्रमांत पालकांनीही सहभाग दर्शविला. संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत अशा प्रकारचे उपक्रम राबवित असल्याबद्दल पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.
फोटो ४ –



