Uncategorized

कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांची नवनिर्माण महाविद्यालयाला भेट

रत्नागिरी : कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश श्रीधर कीर यांनी काल (२२ जून) नवनिर्माण महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला.

ही निवडणूक लढवताना पदवीधर बेरोजगारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची आग्रही भूमिका त्यांनी यावेळी मांडली. कोकण विभागीय मंडळाची स्थापना झाल्यापासून गेली १३ वर्षे कोकण बोर्ड महाराष्ट्रात मंडळ अव्वल आहे असे असतानाही एमपीएससी, यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षेत कोकणातली मुले मागे आहे. त्यांना यांसारख्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन पुरेसे नाही. त्यासाठी कोकणातली सर्वच शिक्षण संस्थांच्या समन्वयाने कोकणातली जास्तीत जास्त मुले स्पर्धा परीक्षांकडे वळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

सध्या येऊ घातलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) हे महाविद्यालयांसाठी पूरक आहे की मारक आहे याचा कोणताही विचार न करता ते लागू केले जात आहे. कोणतेही शैक्षणिक धोरण अवलंबिताना पुढील २५ वर्षे ते धोरण राबविले जाईल याचा विचार होणे गरजेचे असते. भविष्यातील संभाव्य प्रश्न आणि त्याचे निराकरण या दोन्ही बाबी आवश्यक आहेत; मात्र आताचे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविताना याचा कोणताही विचार झालेला नाही. याकडेही विशेष लक्ष देणार असल्याचे श्री. कीर यांनी सांगितले. हे सर्व करत असतानाच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न ही सोडविणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी व्यासपीठावर नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button