रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य महिलांच्या हाती

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने या मतदारसंघात उभ्या राहणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य महिलांवर अवलंबून आहे. पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या २१ हजार ४८६ ने अधिक आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात आधीपासूनच महिला मतदारांचे वर्चस्व आहे. या निवडणुकीतही महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने ही परंपरा कायम राखली गेली आहे. या मतदारसंघात महिलांची मते निर्णायक असून, त्यांचे पारडे कोणत्या उमेदवाराकडे झुकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, या मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी निवडणूक होत आहे. या मतदारसंघात १ हजार ९४२ मतदान केंद्रांवर १४ लाख ३८ हजार ४७१, मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यात ७ लाख ८ हजार ४८७ पुरुष आणि ७ लाख २९ हजार ९७३ महिला मतदार आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या ११ हजार २६१, तर ८५ वर्षांवरील मतदारांची संख्या २६ हजार ४२६ आहे. जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली असून, या मतदारसंघात १२ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्जांची छाननी २० एप्रिलला होणार असून, २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. या मतदारसंघात ३२ भरारी पथके तैनात ठेवण्यात येणार आहेत; तसेच १६ चेकपोस्ट २४ तास सुरू राहतील.



