‘कोकणातील पायाभूत सुविधा, नवीन मानकं तयार करण्यावर भर’ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी : ‘फॉरेन्सिकमध्ये राज्याला नंबर वन आणणार. बँका, नॉन बँकिंग फायनान्शियल डिस्ट्रिब्युटर, रेग्युलेटर, सोशल साईटस एकाच प्लॅटफॉर्मवर असतील, सायबर गुन्हा घडला विशेषतः पैशाच्याबाबतीत फ्रॉडची घटना घडली की, तासाभरात पैसे थांबवून ते परत मिळतील, असा चांगला प्लॅटफॉर्म करण्याचे काम सुरू आहे. हा देशातला सर्वोत्तम प्लॅटफॉर्म असणार आहे. यातून सायबर सुरक्षा मिळेल. कोकणात पायाभूत सुविधा, नवीन मानकं तयार करण्यावर शासनाने मोठा भर दिला आहे, ‘असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहत नुतन इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते १४ मार्चला रत्नागिरीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधूरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, बाळ माने आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा व भारतीय साक्ष कायदा या नव्या कायद्यांमुळे जलद न्याय मिळणार आहे. फॉरेन्सिक पुरावा साक्ष म्हणून कसा धरता येईल त्यादृष्टीने कायदा केला आहे. फॉरेन्सिक क्षमता वाढविण्याचे कामही केले आहे. येत्या ३- ४ महिन्यांत फॉरेन्सिकमध्ये राज्याला नंबर वनमध्ये आणणार. न्याय जलद मिळाला पाहिजे, यासाठी केंद्र आणि राज्य शासन काम करत आहे. सायबर सुरक्षा देण्याचे काम होत आहे. कोकणात पायाभूत सुविधा कशा तयार करता येतील, नवीन मानकं कशी तयार करता येईल, यावर शासनाने मोठा भर दिला आहे. काजू उत्पादकांसाठी साडेतीनशे कोटी देण्याचा निर्णय केला आहे.’
सर्व सामान्यांचा विचार करणारे आपले सरकार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बचत गटाचे भांडवल दुप्पट केल्याची माहिती दिली. महिलांच्या हातांना रोजगार देण्याचे काम, त्यांना सक्षम करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘शक्तीवंदना’च्या माध्यमातून केले आहे. जिल्ह्यातल्या बचत गटांना मिळलेल्या २३५ कोटींमधून महिला अत्यंत वेगाने रोजगारविषयक काम सुरू करतील आणि त्यातून त्या सक्षम होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला असून, जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम होत असल्याचे सांगितले. गोव्याच्या धर्तीवर राज्यशासन काजू उत्पादकांसाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचे ते या वेळी म्हणाले.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, ‘श्री. फडणवीस अर्थमंत्री असताना प्रशासकीय इमारतीसाठी निधी मंजूर केला होता, त्या कामाचे भूमिपूजन आज झाले. याचे लोकार्पण ही आपल्या हस्ते व्हावे, असा माझा आग्रह होता. रत्नागिरीत जेम्स अँड ज्वेलरीचे प्रशिक्षण केंद्र होत आहे. त्यामधून ३५ हजार ते २ लाखांपर्यंत युवकांना मिळणार आहेत. डिफेन्स क्लस्टरचा सामंजस्य करारही रत्नागिरीत करावा.’
खासदार श्री. तटकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व मान्यवरांचे स्वागत विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दराडे यांनी केले. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी आभार मानले.
झालेले सामंजस्य करार
१. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल व उद्योग विभाग यांच्यात झालेल्या करारानुसार प्रती वर्ष ५०० कुशल मनुष्यबळ निर्माण करून स्थानिकांना जेम्स अँड ज्वेलरी व तत्सम उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रेन आणि कार्यकारी अध्यक्ष नीरव भन्साळी यांच्यात करार झाला.
२. टाटा टेक्नॉलॉजिस लिमिटेड यांच्यावतीने उपाध्यक्ष सुशीलकुमार आणि उद्योग विभाग, एमआयडीसी यांच्यावतीने प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांच्यात करार झाला. प्रतीवर्ष ७ हजार कुशल मनुष्यबळ निर्माण करून स्थानिकांना उद्योग व विविध व्यवसायांमधून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.



