‘आम्ही सिद्ध लेखिका’तर्फे महिला दिन उत्साहात

रत्नागिरी : जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही सिद्ध लेखिका (कोकण विभाग) यांच्यातर्फे ‘तिचा दिवस’ १० मार्चला साजरा करण्यात आला. यात विविध गुणदर्शनाबरोबरच ‘रजोनिवृत्ती – समस्या की एक टप्पा’ यावर चर्चासत्र झाले.
आम्ही सिद्ध लेखिकाच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सौ. सुनेत्रा जोशी आणि प्रमुख अतिथी सौ. साधना ओगले यांनी दीपप्रज्वलन आणि सरस्वतीला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी मनोगत व्यक्त करताना सौ. सुनेत्रा जोशी यांनी साहित्यात यशस्वी होण्यासाठी म्हणजेच ते साध्य करण्याची त्रिसूत्री सांगताना सराव सातत्य आणि संयम आवश्यक असल्याचे सांगितले. विविध गुणदर्शन कार्यक्रमात वसुंधरा गोखले यांनी देवीचा जोगवा सादर केला. लता जोशी यांनी लाडीगोडी हे स्फूटलेखन सादर केले. कुंदा बापट, शर्वरी जोशी, स्नेहल तुळसणकर, मेघना मराठे, अनुप्रिता कोकजे यांनी बहारदार अशा ‘तिच्या’ कविता सादर केल्या, तर अनुराधा दीक्षित यांनी मालवणी कविता सादर केल्या. सरीता गोखले आणि विशाखा पाटोळे यांनी त्यांच्या गझल सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. उमा जोशींचा ‘आलवणातली बाई’ हा लेख अंतर्मुख करून गेला. अनुराधा आपटेंनी फसलेल्या पदार्थाची कहाणी छान जमवली. तर मनिषा शितूत यांनी ‘नटसम्राट’चा एकपात्री प्रयोग सादर केला. सुनेत्रा जोशींनी तिची गझल सादर केली. साधना ओगले यांनी कविता सादर केली.
दुसऱ्या सत्रात ‘रजोनिवृत्ती – समस्या किंवा एक टप्पा’ यावर चर्चा झाली. डॉ. मंजिरी जोग यांनी रजोनिवृत्ती काळातले त्रास आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार याबद्दल माहिती दिली; तसेच शंकाचे समाधान केले. या प्रसंगी साधना ओगले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता कोकजे यांनी केले. प्रस्तावना सौ. ऋतुजा कुळकर्णी यांनी केली.



