‘नवनिर्माण हाय’मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन साजरा
संचालिका सीमा हेगशेट्ये यांच्या संकल्पनेतून साकारले विविध गुणदर्शन कार्यक्रम

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण हाय इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन आज (२३ फेब्रुवारी) विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात साहित्य वृक्षाची सजावट करून झाली. या वेळी संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हायच्या मुख्याध्यापिका सौ. नजमा मुजावर यांसह विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी कवी गणेश घुले यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ या कवितेवर मुलांनी ठेका धरला. त्यानंतर वेदिका आरभावे या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी राजभाषा गौरव दिनाचे महत्त्व विशद केले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सृष्टी कोकरे हिने ‘मराठी भाषेचे महत्त्व’, तर पुष्कर गमरे याने ‘मोबाईलच्या विळख्यात आजचा विद्यार्थी’ या विषयावर आपली मते मांडली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’, ‘म्यानातून उसळे तलवारीची पात’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ या ही गीते सादर केली. त्यांना सोहम देसाई याने तबलासाथ, तर ओजस करकरे याने हार्मोनियमसाथ केली. त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यानंतर राधेय धोपटकर याने कुसुमाग्रज, दुर्वांक गुरुसाळे याने आण्णाभाऊ साठे, अय्यान तडवी याने बालकवी, योगराज पवार याने सुरेश भट, काव्या विलणकर हिने बहिणाबाई चौधरी, संस्कृती कोकरे हिने शांता शेळके, अंजल कृष्णा याने नारायण सुर्वे, मुग्धा सावंत हिने भालचंद्र नेमाडे, भूमी बासुदकर हिने विजया वाड, अमेय खामकर याने साने गुरूजी, पूर्वा घाडी हिने प्रिया तेंडुलकर, विधी कापडी हिने पु. ल. देशपांडे, अनुश्री साळवी हिने सुधा मूर्ती यांचा परिचय उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिला.
या वेळी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका सौ. मुजावर यांनी मराठी भाषा केवळ बोलण्यापूर्ती न वापरता त्या भाषेचा अभ्यासही असायला हवा असे सांगितले. ‘महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यानी महाराष्ट्राच्या साहित्याची, संस्कृतीची ओळख उपस्थितांना करून दिली. शालेय पुस्तकाव्यतिरिक्त आपण किती लेखक, कवींना वाचतो याचा विचार करून शालेय पुस्तकाबाहेर जाऊन त्यांना वाचले पाहिजे, जाणून घेतले पाहिजे. सीमा हेगशेट्ये यांनी मांडलेली लेखक परिचय ही संकल्पना कौतुकास्पद असून त्यातून विद्यार्थ्यांना अनेक लेखक, कवी समजले,’ असे त्या म्हणाल्या.

संस्थेच्या संचालिका सौ. हेगशेट्ये यांनी वि. वा. शिरवाडकरांची माहिती देतानाच त्यांनी कुसुमाग्रज कसे धारण केले याची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी नवनवीन शब्दांची त्यांच्या अर्थासहित ओळख घ्या आणि त्यासाठी गुगल न करता वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन करतानाच वाचनालय हे ज्ञान वाढविण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सौ. हेगशेट्ये यांनी नमूद केले. दरम्यान, नवनिर्माण हायमध्ये दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र असल्याने २७ फेब्रुवारीला साजरा होणारा मराठी राजभाषा गौरव दिन शाळेत आज साजरा करण्यात आल्याचेही सांगितले.



