पर्यटनमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

धामणसे हटवाडी येथील सोमगंगा नदीवरील पूल बनलाय पर्यटकांचे आकर्षण केंद्र

रत्नागिरी : धामणसे ग्रामपंचायत हद्दीतील सोमगंगा नदीवरील बहुप्रतिक्षित हटवाडी पुलाचे काम पूर्ण झाले असून, या विकासकामामुळे धामणसे परिसराच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. निसर्गरम्य वातावरण, सोमगंगा नदीचे सौंदर्य आणि पुलामुळे उपलब्ध झालेली सुविधा यामुळे हा परिसर आता पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनला आहे. दररोज शेकडो पर्यटक येथे भेट देत असून सोशल मीडियावरही या ठिकाणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.

धामणसे हटवाडी पूल आणि सोमगंगा नदी परिसरातील निसर्गसौंदर्याने सोशल मीडियावरही मोठी लोकप्रियता मिळवली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, लाखो नागरिकांनी या निसर्गरम्य स्थळाला पसंती दिली आहे. कोकणातील एक नवीन पर्यटनस्थळ म्हणून धामणसे हटवाडी परिसराची ओळख निर्माण होत असून, पर्यटकांचा वाढता प्रतिसाद या ठिकाणाच्या लोकप्रियतेची साक्ष देत आहे.

धामणसे हटवाडी पुल म्हणजे दूरदृष्टीतून साकारले विकासाचे मॉडेल; बांधकाम मंत्री असताना श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. सध्या ते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार म्हणून कोकणच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहेत.भूमिपूजनावेळी रवींद्र चव्हाण यांनी पावसाळ्यात नागरिकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी हा पूल महत्त्वपूर्ण ठरेल, असे सांगितले होते. तसेच केवळ पूल उभारणे नव्हे, तर जलसंधारणासोबत ग्रामीण विकासाचे एक आदर्श मॉडेल उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. आज हे विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

    पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने जलसंधारणाला मिळाली चालना

धामणसे येथील सोमगंगा नदीतील गाळ काढण्याचे महत्त्वपूर्ण काम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि नाम फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले. नदीतील मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ काढल्यामुळे नदीची जलधारण क्षमता वाढली असून, आज या परिसरातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.

या जलसंधारणाच्या कामाचा सकारात्मक परिणाम म्हणून नदी परिसरातील आजूबाजूच्या विहिरींनाही मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेती, ग्रामस्थांचे पिण्याचे पाणी आणि परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांना मोठा फायदा झाला आहे.

या कामासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. विकासकामांसोबतच जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाला महत्त्व देण्याची त्यांची भूमिका या माध्यमातून अधोरेखित झाली आहे.

रत्नागिरी–लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. किरण उर्फ भैय्या सामंत यांनी नुकतीच या ठिकाणी भेट देऊन पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सोमगंगा नदीच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत या निसर्गरम्य परिसराचा अनुभव घेतला.

त्यांच्या या भेटीमुळे धामणसे येथील पर्यटनाच्या दृष्टीने असलेल्या संभाव्यतेला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आमदार किरणजी सामंत यांनी सांगितले की, पुलाजवळ आवश्यक सोयी-सुविधांसाठी आर्किटेक्टच्या माध्यमातून आराखडा तयार करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले

या सर्व प्रयत्नांना सातत्यपूर्ण पाठपुराव्याची जोड देणारे धामणसे गावचे सुपुत्र, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक श्री. उमेश कुळकर्णी यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.

या पुलाचे बांधकाम प्रसिद्ध ठेकेदार श्री. राजेश रमाकांत मुकादम यांनी उत्कृष्ट दर्जाने आणि नियोजित वेळेत पूर्ण केले. दर्जेदार काम, नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि वेळेचे भान राखत त्यांनी हे महत्त्वपूर्ण विकासकाम यशस्वीपणे पूर्ण केले

श्री. उमेश कुळकर्णी यांनी सांगितले की, “धामणसे हटवाडी पूल हा केवळ वाहतुकीसाठी नसून ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या उर्वरित सोयी-सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

परिसराचा नियोजनबद्ध आणि झपाट्याने विकास मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. शासन व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीचा योग्य व पारदर्शक वापर करून या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

        स्थानिकांना रोजगाराच्या संधी

बचतगटाच्या महिलांनी वडापाव, भजी, चहा, मिसळ अशा विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल पुलाजवळ सुरू केले आहेत. त्यामुळे स्थानिक महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या असून धामणसे हटवाडी पूल हा कोकणातील ग्रामीण पर्यटन आणि विकासाचा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.

धामणसे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अमर रहाटे यांनी पर्यटकांना आवाहन करताना सांगितले की, “सोमगंगा नदी परिसर हा निसर्गाने दिलेला सुंदर ठेवा आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने आपल्या जीवाची व सुरक्षिततेची काळजी घ्यावी. पाण्याचा अंदाज घेऊनच आनंद घ्यावा तसेच परिसराची स्वच्छता आणि सुंदरता जपावी.”

“या पर्यटनस्थळी मद्यपान, गांजा, सिगारेट तसेच इतर कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन करणे अथवा परिसरात कचरा करणे टाळावे. अशा प्रकारचे गैरकृत्य आढळून आल्यास तात्काळ पोलिस प्रशासनाला कळवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच वाद, भांडण किंवा मारामारी करणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल. कोणत्याही अनुचित प्रकारासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ जबाबदार राहणार नाहीत.”

“पर्यटकांनी धामणसे गावाला सहकार्य करून या निसर्गरम्य ठिकाणाचा आनंद घ्यावा आणि या परिसराची सुंदरता कायम राखण्यासाठी आपले योगदान द्यावे,” असे आवाहन सरपंच श्री. अमर रहाटे यांनी केले.

यावेळी धामणसे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अमर रहाटे, उपसरपंच सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी, ग्रामपंचायत सदस्या सौ. वैष्णवी धनावडे, श्री. रत्नेश्वर ग्रंथालय धामणसेचे अध्यक्ष श्री. उमेश कुळकर्णी, मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी, माजी सरपंच अविनाश जोशी, जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य श्री. सचिन करमरकर आणि रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. मानसी सचिन करमरकर, माध्यमिक शिक्षण मंडळ धामणसेचे खजिनदार श्री. विश्वास धनावडे, श्री. सिद्धेश चव्हाण, श्री. धनराज पवार तसेच ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि सुमारे पाचशे ते सातशे पर्यटक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button