उद्योगमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

कोकणी फणसाच्या बियांनां सोन्याचे दिवस!; बाजारपेठेत २०० रुपये किलोपर्यंत दर!!

रत्नागिरी: एकेकाळी फणसाचे गरे खाल्ल्यानंतर निरुपयोगी समजून टाकून दिल्या जाणाऱ्या फणसाच्या बियांना (आठळ्यांना) आता बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण झाली असून, त्यांना सोन्याचे दिवस आले आहेत. सध्या या बिया चक्क १५० ते २०० रुपये प्रति किलो दराने विकल्या जात असल्याने शेतकऱ्यांसाठी फणस हे उत्पन्नाचे दुहेरी साधन ठरत आहे.

कोकण, पश्चिम घाट आणि दक्षिण भारतातील उष्ण व दमट हवामानात उत्तम वाढणारा फणस, आता केवळ एक फळ न राहता शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा एक मजबूत स्रोत बनला आहे.

फणसाच्या बियांमध्ये प्रथिने, लोह, पोटॅशियम आणि झिंक यांसारखी पोषक तत्वे मुबलक असल्याने, त्यावर प्रक्रिया करून तयार केल्या जाणाऱ्या पिठाला जागतिक बाजारपेठेत ‘सुपरफूड’ म्हणून मागणी वाढली आहे. ग्लुटेनमुक्त आहार म्हणून बिस्किटे, केक आणि इतर मूल्यवर्धित पदार्थांमध्ये या पिठाचा वापर केला जात असल्याने उद्योजकांसाठी नव्या संधी खुल्या झाल्या आहेत. 

फणसाचे गरे आणि कच्चा फणस यांच्या विक्रीतून तर फायदा होतोच, पण आता बियांच्या मूल्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी उत्पन्न वाढणार आहे.

ग्रामीण भागातील महिला बचतगट आणि लघुउद्योजकांनी फणस प्रक्रिया उद्योगातुन  फणसाचे लोणचे, चिप्स, जॅम आदी विविध पदार्थ तयार करून त्याच्या विक्रीतून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. फळापासून ते लाकडापर्यंत सर्वच गोष्टी उपयुक्त असल्याने फणसाला अनेक ठिकाणी ‘कल्पवृक्षाचा’ दर्जा दिला जात आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि प्रक्रियेच्या जोडीमुळे फणस हे फळझाड आता कोकणच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारे ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button