मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्तसाहित्य-कला

कोमसाप आणि केशवसुत स्मारक ही माझी दोन पुस्तके अमर : पद्मश्री मधु मंगेश कर्णिक 

रत्नागिरी : माझी पुस्तकांवर वाचकांनी भरभरून प्रेम केले. मात्र कोकण मराठी साहित्य परिषद आणि मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक ही माझी दोन पुस्तके अमर आहेत.

वाचकांनी यापुढे ती सांभाळावीत, असे भावनिक आवाहन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोमसाप यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. कर्णिक यांचा नागरी सत्कार मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मधुभाईंचा नागरी सत्कार करण्यात आला. शनिवारी हा कार्यक्रम झाला. प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या १४ फेब्रुवारी या दिवशी यानिमित्ताने रत्नागिरीच्या स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात एका वेगळ्याच प्रेमाविष्काराचे दर्शन घडले. आपल्या लेखणीतून उतरलेल्या ९० पुस्तकांमधून कोकणाच्या लाल मातीचं विविधांगी दर्शन घडवणारे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना लाभलेल्या साहित्यरसिकांच्या प्रेमाचे हे दर्शन होते. त्यांच्या साहित्यसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याला डहाणूपासून दोडामार्गपर्यंतच्या संपूर्ण कोकणातले रसिक आणि अशोक बागवे, अरुण म्हात्रे यांच्यासारखे अनेक दिग्गजही उपस्थित होते.

हृद्य सत्काराला तितकेच भावपूर्ण उत्तर देताना मधुभाईंनी सांगितले, की अन्य प्रांतातल्या साहित्यिक अस्मिता धारदार असल्या, तरी कोकणच्या साहित्यिक अस्मिता सुईसारख्या टोकदार आहेत. सुई शिवण्याचे काम करते, तसेच आम्ही कोकणी लोक सांधण्याचे काम करतो. कोणाचा दुस्वास करत नाही. साहित्य म्हणजे सहत्व. माणसे एकत्र येण्यातून तयार होते ममत्व आणि त्यातून होते विराट समाजाचे एकत्व. समाज एकात्म झाला, की त्यातून ‘सत्यम शिवम सुंदरम्’चे दर्शन घडते. साहित्यासह संगीत, नृत्य, नाट्य या कला हेच सांगतात, अशा शब्दांत मधुभाईंनी साहित्याची नेमकी व्याख्या सांगितली. प्रादेशिक अस्मिता असणे पाप नाही; पण सगळ्यांनी महाराष्ट्र एक आहे हे लक्षात ठेवून वागले, तर वेगळेपणाचे विचार मनात येणार नाहीत, असे सांगतानाच कोमसाप आणि केशवसुत स्मारक ही आपली दोन पुस्तके अमर आहेत, अशी कृतार्थतेची भावनाही मधुभाईंनी व्यक्त केली.

मधुभाई म्हणाले, मराठी भाषेकडे आपल्याला लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. आजची पुस्तके, प्रसारमाध्यमांवरील कार्यक्रम पाहिले की भाषेबद्दल एक चिंता निर्माण होते. दहावीपर्यंतचे सक्तीचे शिक्षण अथवा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी एवढ्यावरच आपण थांबता कामा नये. प्रमाण भाषेच्या विकासासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे शुद्धीकरण ही आता काळाची गरज आहे.

यावेळी साहित्यिक ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button