इजिप्तच्या कैरो भूमीत घुमला ठाण्याचा मानबिंदू; लोकमत ‘वन वर्ल्ड’ पुरस्काराने सन्मान

ठाणे:- प्राचीन संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेल्या इजिप्तची राजधानी कैरो येथे पार पडलेल्या दिमाखदार आंतरराष्ट्रीय सोहळ्यात ठाणे जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उजळून निघाले. साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘लोकमत वन वर्ल्ड’ हा मानाचा पुरस्कार ठाणे जिल्ह्यातील डॉ. प्रा. प्रदीप ढवळे यांना प्रदान करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मिळालेला हा सन्मान राज्याच्या शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.
हा सोहळा केवळ गौरवाचा क्षण न राहता भारत आणि इजिप्त यांच्यातील दृढ होत चाललेल्या सांस्कृतिक व वैचारिक संबंधांचे प्रतीक ठरला. नाईल नदीच्या काठी वसलेल्या ऐतिहासिक कैरो शहरात भारतीय गुणवत्तेचा सन्मान होणे, हे दोन्ही देशांमधील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला नवी दिशा देणारे ठरले. ‘वन वर्ल्ड’ या संकल्पनेतून भारत–इजिप्तमधील ऐतिहासिक मैत्रीचे प्रतिबिंब ठळकपणे दिसून आले.
लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या भव्य सोहळ्यास भारतीय उद्योग, कला, साहित्य, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेत्री सौंदर्य शर्मा यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
पुरस्कार स्वीकारताना भावना व्यक्त करताना डॉ. प्रा. प्रदीप ढवळे म्हणाले, “हा पुरस्कार मी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक तसेच माझ्या सर्व हितचिंतकांना अर्पण करतो. आई-वडील आणि कुटुंबीयांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. इजिप्तसारख्या भव्य ऐतिहासिक शहरात हा सन्मान मिळणे हे मी माझे भाग्य समजतो.” त्यांनी आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल लोकमत समूहाचे मनःपूर्वक आभार मानले.
साहित्यिक मूल्यांचे जतन करताना शैक्षणिक संस्थांच्या सक्षमी करणासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानामुळेच त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. इजिप्तच्या भूमीत भारतीय कर्तृत्वाचा झेंडा फडकवल्याने ठाणे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



