मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा वृत्त

सोनवडे बौद्धवाडीत ध्वजस्तंभाची तोडफोड; वातावरण तापले होते; पोलिस फौजफाटा तैनात, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

संगमेश्वर : तालुक्यातील सोनवडे बौद्धवाडी येथे रस्त्याच्या लगत असलेल्या ध्वजस्तंभावर अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणानंतर शनिवारी येथील वातावरण तापले. बौद्धवाडीतील ग्रामस्थ जमा झाले. या घटनेची माहिती देवरुख पोलिसांना मिळताच देवरुख पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी शनिवारी श्वान पथक, ठसेतज्ज्ञ तसेच फॉरेन्सिक लॅबची मदत घेण्यात आली. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मार्गावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास आला त्यांनी तात्काळ देवरुख पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक उदय झावरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणेकडून रात्रभर पहारा ठेवण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बाजीराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला. दिवसभर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि पोलिस निरीक्षक उदय झावरे हे राखीव सुरक्षादलासह परिसरात तैनात होते.

सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ध्वजस्तंभ पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते. परिसरात शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button