मतदानाचा टक्का घसरला

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्या वर्षी मतदानाचा टक्का घसरला आहे. जिल्हा प्रशासनाने विविध पातळीवर प्रचार आणि प्रसार करूनसुद्धा यंदा कमी मतदान झाले. २०१४ आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकींच्या तुलनेत यावर्षी केवळ ५९.२३ टक्के मतदान झाले असून, मतदानाचा घसरलेला टक्का कुणाला नुकसानदायक ठरेल याचे अंदाज आता बांधले जात आहेत.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात एकूण ६५.८९ टक्के, तर सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६१.६९ टक्के मतदान झाले होते. बोट रॅली, पथनाट्य, फलक, मानवी साखळी, घोषवाक्य आदींच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी जगजागृती केली होती. यावर्षी १३ हजार १५६ नवमतदारांची नोंद करण्यात आली होती. मात्र तरीही या मतदारसंघातील १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांपैकी ८ लाख ७ हजार ५६२ मतदारांनीच आपला हक्क बजावला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघात ५५ ते ५८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी मतदारसंघात ६० ते ६३ टक्क्यांपर्यंत मतदान झाले.
या मतदारसंघात विनायक भाऊराव राऊत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), नारायण तातू राणे (भाजप), सुरेश गोविंद शिंदे (सैनिक समाज पक्ष), विनायक लवू राऊत (अपक्ष), राजेंद्र लहू आयरे (बसपा), मारुती रामचंद्र जोशी (वंचित बहुजन आघाडी), अशोक गंगाराम पवार (बहुजन मुक्ती पार्टी) या ९ उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यातील कोणीही माघार न घेतल्याने हे नऊही उमेदवार रिंगणात होते; मात्र खरी चुरस विनायक राऊत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि नारायण राणे (भाजप) यांच्यातच होती. इंडिया आघाडी आणि महायुती दोघांकडूनही जोरदार प्रचारयंत्रणा राबविण्यात आली होती. हे दोन्ही महत्त्वाचे राजकीय पक्ष आणि जिल्हा प्रशासन यांचे प्रयत्न पाहता गतवेळच्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी ६५ ते ७० टक्क्यांपर्यंत जाईल असे अनुमान होते. मात्र ६० टक्क्यांची सरासरी न गाठता आल्याने कमी झालेला हा टक्का कोणत्या उमेदवाराचे नुकसान करेल याविषयी आता वेगवेगळी गणिते बांधली जात आहेत.
दरम्यान, मतदार याद्या अद्ययावत नसल्याचा फटका अनेक मतदारांना बसला आहे. अनेक मतदान केंद्रांवर मतदार मतदान यादीत नाव समाविष्ट नाही म्हणून निराश होऊन परतत होते. अनेक मतदारांचे नाव कोणत्या मतदान केंद्रावर आले आहे याची माहिती नसल्याने वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर हेलपाटे मारत होते आणि अखेरिस मतदान न करताच जात होते. अजब बाब म्हणजे मयत झालेल्या व्यक्तींची नावही मतदारयादीत समाविष्ट केल्याची बाब पुढे आली. त्याचप्रमाणे अनेक मतदारांची नावे दोनदा होती. स्थलांतराचा फटकाही मतदान कमी होण्याला कारणीभूत ठरला. या सर्वांचा टक्केवारीत विचार केला तरी ही १५ ते २० टक्के मते इथेच वाया गेल्याचे निष्पन्न झाले आहे.



