मुख्य बातमी

कॅन्सरचा धक्कादायक शोध; मेंदूप्रमाणे ‘विचार’ करणाऱ्या ट्यूमर पेशी !

कर्करोगाचे (कॅन्सर) अनेक प्रकार आहेत. या सर्व प्रकारांमधील फुफ्फुसाचा कॅन्सर हा अत्यंत घातक प्रकार मानला जातो. जगभरात फुफ्फुसाचा कॅन्सर हा कॅन्सरमुळे होणाऱ्या सर्व मृत्यूंमागील प्रमुख कारण आहे, भारतातही हीच परिस्थिती आहे.

अनेकदा हा आजार गंभीर अवस्थेत पोहोचेपर्यंत लक्षातच येत नाही. भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे दरवर्षी सुमारे ६०,००० लोकांचा मृत्यू होतो. धूम्रपान हे या कर्करोगाचे प्रमुख कारण मानले जाते.

फुफ्फुसाच्या कॅन्सरचे दोन प्रकार

भारतातही फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. हा कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये (उदा. मेंदू, यकृत, हाडे) लवकर पसरत जातो. या रोगाचे दोन मुख्य प्रकार आहेत.

१) नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC)

२) स्मॉल सेल लंग कॅन्सर (SCLC)

संशोधांचा उद्देश

या दोघांमध्ये, SCLC हा अत्यंत आक्रमक आणि जलद पसरत जाणारा प्रकार आहे. हा प्रकार धूम्रपानाशी संबंधित असतो आणि फुफ्फुसापासून शरीराच्या इतर भागात विशेषतः मेंदूत जलदगतीने पसरतो. सुरुवातीला उपचारांना प्रतिसाद मिळूनही, हा कॅन्सर पुन्हा (relapse) उद्भवतो आणि औषधांना प्रतिकार (drug resistance) निर्माण करतो. याच कारणामुळे SCLC पेशींच्या विशेष वर्तनामागे कोणती अंतर्गत यंत्रणा कार्यरत आहे, हे समजून घेण्यासाठी स्टॅनफर्ड मेडिसिन आणि फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट यांनी संयुक्तरित्या संशोधन केले. या संशोधनातून एक अत्यंत महत्त्वाचा नवीन निष्कर्ष समोर आला. SCLC पेशी केवळ अनियंत्रितपणे वाढत नाहीत, तर त्या मेंदूतील न्यूरॉन्सप्रमाणे ‘फंक्शनल सिनॅप्स’ तयार करतात. या संबंधित ‘Functional synapses between neurons and small cell lung cancer’ नावाचा शोधनिबंध ‘Nature’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे.

न्यूरल सिनॅप्स म्हणजे काय?

सिनॅप्स म्हणजे दोन पेशींमधील सूक्ष्म जोडण्या. त्यांच्या माध्यमातून पेशी एकमेकांशी विद्युत आणि रासायनिक संकेतांची देवाणघेवाण करतात. मेंदूमध्ये न्यूरॉन्स एकमेकांना माहिती पाठवण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. या सिग्नल्समुळे आपले विचार, हालचाल, स्मृती आणि भावना नियंत्रित होतात. SCLC पेशींमध्येही अशाच प्रकारच्या जोडण्या निर्माण होतात आणि त्या मेंदूतील न्यूरॉन्सशी थेट संवाद साधू शकतात, हे नव्या संशोधनात अभ्यासकांना आढळून आले आहे.

या प्रक्रियेत, कर्करोग पेशी न्यूरॉन्सकडून ग्लूटामेट (Glutamate) आणि GABA (Gamma-Aminobutyric Acid) सारखे न्यूरोट्रान्समीटर स्वीकारतात. हे रासायनिक द्रव्य मेंदूत सिग्नल ट्रान्समिशनसाठी महत्त्वाचे असते. पण आता हेच घटक कॅन्सर पेशींनाही सिग्नल पुरवतात. त्यामुळे SCLC पेशी मेंदूच्या सूक्ष्म रासायनिक वातावरणाशी जुळवून घेतात आणि त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवणारे किंवा वाढीस पोषक असणारे संकेत मिळवतात.

       मेंदू आणि कर्करोग पेशींचा संवाद

या सिनॅप्ससारख्या जोडण्यांमुळे SCLC पेशी मेंदूच्या वातावरणात अधिक चपळ, बुद्धिमान आणि टिकाऊ होतात. ग्लूटामेट या सिग्नलमुळे पेशींच्या वाढीचा वेग वाढतो, ग्लूटामेट पेशींच्या विभाजनाला चालना देणारे मार्ग सक्रिय करते. त्याउलट, GABA हे काही प्रमाणात नियंत्रण ठेवते, परंतु दोन्ही सिग्नल्स मिळून पेशींच्या अस्तित्वाला अनुकूल परिस्थिती निर्माण करतात.

त्यामुळे मेंदू आणि कर्करोग पेशींमध्ये एक गुंतागुंतीचा संवाद निर्माण होतो. कर्करोग पेशी मेंदूकडून मिळणाऱ्या सिग्नल्सचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी, टिकाव धरण्यासाठी आणि उपचारांपासून बचाव करण्यासाठी करतात. परिणामी, SCLC फक्त फुफ्फुसापुरताच मर्यादित राहत नाही, तर तो मेंदूशी थेट संपर्क साधणारी ‘न्यूरो-कर्करोगीय प्रणाली’ विकसित करतो.

वैद्यकीय परिणाम आणि भविष्यातील उपचार 

या संशोधनाने कर्करोगशास्त्राला एक नवीन दिशा दिली आहे. आतापर्यंत SCLC साठी वापरले जाणारे केमोथेरपी सारखे उपचार पेशींचा नाश करते होते, पण त्यांच्या थेट संवाद प्रणालीवर प्रहार करत नाहीत. आता संशोधकांचा भर आता ‘न्यूरल कम्युनिकेशन ब्लॉकर्स’ किंवा ‘सिनॅप्टिक इनहिबिटर्स’ तयार करण्यावर आहे, जे कॅन्सरच्या पेशी आणि न्यूरॉन्स यांच्यातील संवाद थांबवतील.

हा संवाद बंद करता आला, तर कर्करोग पेशींना वाढीसाठी आवश्यक सिग्नल्स मिळणार नाहीत आणि त्यामुळे त्यांचा प्रसार थांबू शकतो. तसेच, SCLC पेशी जर न्यूरॉनसारखी प्रोटीन्स तयार करत असतील, तर त्या प्रोटीन्सच्या आधारे रोगाचे लवकर निदान (early diagnosis) करणेही शक्य होईल. हे निदान उपचार सुरू करण्यापूर्वीच रोगाची पातळी ओळखण्यात मदत करू शकते.

थोडक्यात सांगायचे तर, SCLC हा फुफ्फुसापुरता मर्यादित रोग नाही. तो मेंदूशी संवाद साधणारा, त्याच्याकडून संकेत घेणारा आणि त्या संकेतांचा वापर स्वतःच्या वाढीसाठी करणारा अत्यंत बुद्धिमान कर्करोग आहे. या शोधामुळे भविष्यातील कर्करोग उपचार अधिक अचूक, तंतोतंत आणि परिणामकारक होऊ शकतात.

हा अभ्यास मानवशरीरातील पेशींच्या संवाद प्रणालीचे गूढ अधिक उलगडतो आणि रोग समजून घेण्यासाठी फक्त त्याच्या जागेवर नाही तर त्याच्या संवाद पद्धतीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे हे स्पष्ट करतो. म्हणूनच हा शोध केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर मानवी शरीराच्या जटिल कार्यप्रणाली समजून घेण्यासाठीही एक क्रांतिकारक पाऊल मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button