प्रादेशिक मनोरुग्णालय अन्यत्र कुठेही हलवू देणार नाही : ऍड. अश्विनी आगाशे
प्रादेशिक मनोरुगणाबाहेर रत्नागिरीकरांचा निषेध

रत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरुग्णालय जयसिंगपूर (कोल्हापूर) येथे हलविण्यात येत असल्याच्या विरोधात रत्नागिरीतील नागरिकांतर्फे १६ ऑक्टोबर रोजी प्रादेशिक मनोरुगणाबाहेर निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी ऍड. अश्विनी आगाशे, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, ॲल्युमिनियम प्रकल्प बाधित संघटनेचे राजेंद्र आयरे यांच्यासह अनेक रत्नागिरीकर उपस्थित होते.
रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय हे पाच जिल्ह्यांसाठी असून त्याची स्थापना १८८६ साली झाली आहे. या रुग्णालयाला १३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या मनोरुग्णालयाचे काम अतिशय कौतुकास्पद असून संपूर्ण महाराष्ट्रातील ते सुसज्ज असे एकमेव मनोरुग्णालय आहे. हे मनोरुग्णालय एकूण १४ एकर अशा विस्तिर्ण जागेत पसरलेले असून ७ एकर जागेला ग्रीन झोन आहे व ७ एकर जागेत बांधकामे आहेत. या मनोरुग्णालयातील स्टाफ प्रशिक्षित असून डॉक्टरही खूप चांगले आहेत. मनोरुग्णालयात येणा-या रुग्णांच्या मनाचा विचार करून इथला स्टाफ त्यांना उत्तम सेवा देतो, त्यांची काळजी घेतो. या रुग्णालयात आजपर्यंत सिंधुदुर्ग, रायगड व अन्य जिल्ह्यातील अनेक मनोरुग्णांनी उपचार घेतले असून ते बरेही झाले आहेत, असे यावेळी ऍड. आगाशे यांनी सांगितले.
अशी कौतुकास्पद परंपरा असलेल्या व अनेक मनोरूग्ण लाभ घेत असलेले हे मनोरुग्णालय जयसिंगपूरला हलविण्याचा अट्टाहास काही राजकीय मंडळींनी व पुढाऱ्यांनी सन २०२२ ते सन २०२४ या तीन वर्षांच्या कालावधीत चालवला असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. त्यासाठी ते वेगवेगळी खोटी कागदपत्रे रंगवून हे मनोरुग्णालय अन्यत्र हलविण्याच्या विचारात आहेत.
वास्तविक उत्तमस्थितीत चालू असलेले व सुसज्ज असे मनोरुग्णालय हलविण्यामागे मनोरूग्णालयाचे मालकीची असलेली १४ एकर जागा घशात घालण्याचा डाव या राजकारण्यांचा दिसत असून, याबाबत आम्ही माहिती घेतली असता असे समजलेकी, यातील मनोरुग्णालयाचा काही भाग सिव्हील हॉस्पिटलला देण्यात येणार आहे. आजही सिव्हील हॉस्पिटलची परिस्थिती खूप वाईट आहे. हे राजकारणी अनेकदा अनेक उद्योग करीत असल्याने डॉक्टरही सिव्हील हॉस्पिटलमध्ये येण्यास तयार नाहीत तर सिव्हील हॉस्पिटलसाठी संपूर्ण मनोरुग्णालय जयसिंगपूर सारख्या ठिकाणी हलविणे म्हणजेच रत्नागिरीकरांवर फार मोठा अन्याय होणार आहे.
यापूर्वी काही पुढारी व मंत्र्यांच्या अट्टाहासापायी रत्नागिरीतील जूनी जे. के. फाईल्स कंपनी, भारती शिपयार्ड कंपनी व एमआयडीसीतील अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद आहेत. शहरात कोणत्याच प्रकारचे नियोजन नाही. आज मनोरुग्णालयाची मोठी जागा स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न या राजकारण्यांनी चालविला आहे. उद्या शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळा, कॉलेज, सरकारी जागा ही घशात घालण्याचा प्रयत्न केला जाईल. तरी आपण सर्व नागरिकांनी या जमिन माफीयांना विरोध केला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
या जमिन माफीया राजकारण्यांनी अनेक उद्योग त्यांच्या स्वतःच्या घशात घातले आहेत. आता मनोरुग्णालयाची १४ एकर जागा ही घशात घालण्याच्या प्रयत्नात आहेत. उद्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या खाजगी आस्थापना व त्यांच्या जागाही स्वतःच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जाईल हे लक्षात घेणे गरजेचे आहे. या भू माफीयांचा आम्ही निषेध करत आहे व मनोरुग्णालयासारखे सुसज्ज रुग्णालय कोणत्याही परिस्थितीत आम्ही अन्यत्र हलवू देणार नाही हा आमचा निर्धार आहे. म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावतोय याचा विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले.
या संदर्भातील निवेदन मनोरुग्णालयातील अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.



