मुख्य बातमीराजकीयलोकसभा २०२४

सहकाराच्या माध्यमातून कोकणात रोजगार उपलब्ध करावा : उदय सामंत

रत्नागिरी : “आमचा रत्नागिरी जिल्हा हा निसर्गसंपन्न असून इथे पर्यटनाचा वारसा आहे. आंबा, काजू हे इथले प्रमुख पिक आहे. असे असूनही कोकणात सहकार रुजला नाही आणि वाढला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केंद्राचे सहकार खातेदेखील असल्याने या गोष्टीची दाखल घेऊन त्यांनी कोकणात सहकार आणण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच कोकणातील प्रमुख पिकांना हाताशी धरून सहकाराच्या माध्यमातून इथे रोजगार उपलब्ध करून द्यावा,” अशी मागणी रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल (३ मे) रत्नागिरीत आले होते. शहरातील गोगटे कॉलेजच्या जवाहर मैदानावर शहा यांची सभा झाली. त्यावेळी पालकमंत्री सामंत बोलत होते. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महायुतीचे उमेदवार नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उद्योजक किरण सामंत, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी खासदार डॉ. नीलेश राणे, भाजपचे आमदार नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने, माजी आमदार विनय नातू, र.ए. सोसायटीच्या शिल्पा पटवर्धन, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र उर्फ बंटी वणजू, राष्ट्रवादीचे महायुती समन्वयक अजित यशवंतराव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, वारकरी समाज कोकण प्रांताचे अध्यक्ष कोकरे महाराज यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

सभेत बोलताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्बारशेखर बावनकुळे

पालकमंत्री सामंत यांनी देशाचे राजकारण करताना माणूस किती जमिनीवर असू शकतो याचा प्रत्यय अमित शहांकडे बघून आल्याचे नमूद केले. आचारसंहिता संपल्यानंतर कोकणात रोजगार देणारा मोठा प्रकल्प देण्याची मागणीही करतानाच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून राणे यांना मोठे मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर एक रुपयाचाही भ्रष्टाचार झाला नाही असे सांगतानाच गेल्या दहा वर्षांत राबवलेल्या आयुषमान भारत, दीनदयाळ अंत्योदय, प्रधानमंत्री जीवनज्योती, कौशल्यविकास, पीएम आवास अशा ५४ योजनांचा आढावा आपल्या भाषणातून घेतला.

महायुतीचे उमेदवार नारायण राणे

महायुतीचे उमेदवार राणे यांनी आपल्याकडे आंबा, काजू, मासे मोठ्या प्रमाणावर असून यावर आपण कोकणचा कॅलिफोर्निया करायचे बोलत होतो, मात्र आता कॅलिफोर्नियाने म्हटले पाहिजे आपण कोकणासारखी प्रगती करू, असा विकास येथे करायचा असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले.
तत्पूर्वी राष्ट्रवादीचे महायुती समन्वयक यशवंतराव, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी आमदार बाळ माने, वारकरी समाज कोकण प्रांताचे अध्यक्ष कोकरे महाराज यांनी भाषण केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button